Rohit Pawar, Ajit Pawar, Sunil Tatkare sarkarnama
पिंपरी चिंचवड

Lok Sabha Election 2024 : दोन्ही राष्ट्रवादीत रंगलाय कलगीतुरा; दुपारी रोहित पवारांचा हल्ला, रात्री तटकरेंचा प्रतिहल्ला

Sunil Tatkare पिंपरी-चिंचवडच्या आढावा बैठकीनंतर मीडियाशी बोलताना तटकरेंनी अजितदादांवर हल्लाबोल करणाऱ्या रोहित पवारांचा समाचार घेतला.

Uttam Kute

Pimpari News : अजितदादांचा भाजपमध्ये आता तेवढा वट राहिला नसल्याने त्यांच्या गटाला महायुतीत लोकसभेच्या अवघ्या चार जागा मिळणार असून, त्यात शिरूर नसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी काल (ता.२१) पिंपरीत केले होते. त्याचा समाचार अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगेच रात्री उद्योगनगरीतच घेतला. यातून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले आहे. Lok Sabha Election 2024

रोहित पवारांची संभावना तटकरेंनी तथाकथित युवा नेता अशी या वेळी केली. त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला राहुल गांधींपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने त्यांना इतके नैराश्य आलंय की, ते काहीही बोलू लागले आहेत, अशा शब्दांत अजितदादांना चार जागा मिळणार असल्याच्या रोहित पवारांच्या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली. जागावाटपाची प्राथमिक चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

ती येत्या एक-दोन दिवसांत दिल्लीत भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे ते म्हणाले. तसेच आम्हाला किती जागा मिळतील, यापेक्षा आघाडीत किती जागा मिळतात आणि त्यातील किती निवडून येतात, हे तथाकथित युवा नेतृत्वाने पाहावे आणि मग आम्हाला सांगावे, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला. महाराष्ट्रात युतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळून केंद्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येणार, असा दावाही तटकरेंनी केला.

मंचरमधील (ता. आंबेगाव, जि. पुणे) कालच्या सभेत शरद पवारांनी दिलीप वळसे-पाटलांना पराभूत करण्याचे आवाहन केले. त्याविषयी विचारले असता, पवारसाहेबांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होते असे नाही, तर कधी तरी नवीन इतिहास घडतो, त्याचे सामर्थ्य अजितदादांच्या नेतृत्वात आहे, हे त्यांनी स्पष्ट करीत एकप्रकारे वळसे हे पुन्हा निवडून येतील, हे अधोरेखित केले.

आकुर्डीतील पक्षाच्या पिंपरी-चिंचवडच्या आढावा बैठकीनंतर मीडियाशी बोलताना तटकरेंनी अजितदादांवर हल्लाबोल करणाऱ्या रोहित पवारांचा समाचार घेतला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, फ्रंटल तसेच बूथ कमिटीच्या कामकाजाची माहिती घेतली. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व एकूण बूथ, त्याची रचना याबाबत सविस्तर माहिती घेऊन सूचना दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शहर कार्याध्यक्ष शाम लांडे, फजल शेख, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे,महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे तसेच कविता खराडे, मनीषा गटकळ आदी या वेळी उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT