उत्तम कुटे
Pimpri Chinchwad : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्षपदाची नियुक्तीही रखडली आहे. या दोन्ही एकमेकांशी निगडीत तथा पूरक आहेत. त्यातील एक झाली,तर दुसरी मार्गी लागणार आहे. या दोन्ही बाबी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि लोकसभेच्याही आगामी निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या आहेत.
दरम्यान, उद्योगनगरी ही मंत्रिपदापासून अद्याप वंचित आहे. आता तरी ते मिळावे म्हणून शहरवासियांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहेत. कारण शहराचा मंत्रिपदाचा बॅकलॉग आणि आगामी महापालिका निवडणूक ध्यानात घेता शहराला यावेळी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी शहरासह भाजपही एकवटला आहे.
भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे(Mahesh Landge) यांना मंत्रिपद मिळाले,तर आनंदच आहे असे भाजपचा आमदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे माजी निवडणूक प्रमुख आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य शंकर जगताप यांनी मंगळवारी (दि.२७) 'सरकारनामा'ला सांगितले.
चिंचवडच्या भाजप आमदार व त्यांच्या वहिनी अश्विनी जगताप यांच्यासमोर त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यातून भोसरीच्या मंत्रिपदाच्या मार्गातील चिंचवडचा अडथळा दूर झाल्याची चर्चा लगेच सुरु झाली. कारण, याच नाहीतर मागील टर्ममध्येही आमदार लांडगे व चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे पती लक्ष्मण जगताप हे दोन प्रबळ दावेदार मंत्रिपदासाठी होते.
पण या चुरशीतून गतवेळी मंत्रिपद मावळला गेले. तेथील भाजप आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे हे राज्यमंत्री झाले. आता ते आमदार नाहीत.तर,लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी ३ जानेवारीला निधन झालेले आहे. त्यामुळे आमदार लांडगेंना तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही. त्यात शहरातील पक्षाचा आमदार असलेल्या चिंचवडचीही साथ आता त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आतातरी शहराला मंत्रीपद मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.
आमदार लांडगे यांची राज्यमंत्री का होईना वर्णी लागली,तर त्यांना भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. तशीही त्यांची या पदाची टर्म पूर्ण झालेली आहे. मात्र,रखडलेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि सध्या सुरु असलेले भाजपचे मोदी @9 हे महाजनसंपर्क अभियान यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यामुळे शहर अध्यक्षपद नियुक्तीही लांबली आहे. जर, आमदार लांडगे मंत्री झाले,तर पिंपरी महापालिकेत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी ती बाब भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.