Political Horoscope Sarkarnama
राजकीय भविष्य

Political Horoscope: महायुती-आघाडीमधील मतभेद उघडकीस येणार; नाशिक, रायगडचा तिढा सुटणार

Mahayuti Aghadi conflict Maharashtra political tension : मंत्रिमंडळातील प्रमुख खात्यांमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता असून, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पालकमंत्रिपदाचा तिढा या काळात सुटेल. प्रमुख पदांवर नवीन व्यक्तींची निवड होईल.

सरकारनामा ब्यूरो

सिद्धेश्वर मारटकर

सप्ताहात रवी-मंगळ केंद्र योग होत असून,मंगळ-प्लुटो प्रतियोग व शनी-शुक्र युती होत आहे. या ग्रहयोगामुळे या काळात राजकीय, सामाजिक वातावरण गरम राहणार आहे. सत्ताधारी पक्षातील, युती-आघाडीमधील मतभेद, धुसफूस उघडकीस येईल. प्रमुख व्यक्तीवर हल्ले होतील. या काळात मोठ्या व्यक्तीचे अपघात, घातपात, मृत्यूच्या घटना संभवतात. मोठ्या व्यक्तींच्या विरोधात सामाजिक रोष, निदर्शने होतील.

या काळात हवेतील उष्णता कायम राहणार असून, विक्रमी तापमानामुळे जनजीवन विस्कळित होईल. या जोडीला अवकाळी पावसाने मोठे नुकसान होऊ शकते. मंगळ-प्लुटो योगामुळे पुढील काळातही मोठे भूकंप होण्याची शक्यता असून, समुद्रकिनारी असणाऱ्या प्रदेशांना किंवा बेटांना त्सुनामी, भूकंपाचा धोका कायम राहील.

या योगामुळे मोठ्या आगीच्या दुर्घटना, मोठे विमान, रेल्वे दुर्घटना, वाहन अपघात यातून मोठी हानी संभवते. या काळात पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतील. मंत्रिमंडळातील प्रमुख खात्यांमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता असून, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पालकमंत्रिपदाचा तिढा या काळात सुटेल. प्रमुख पदांवर नवीन व्यक्तींची निवड होईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या किंवा नवनियुक्तीच्या घोषणा होतील.

मंगळ-प्लुटो योगामुळे या काळात स्फोटक घटना, अतिरेकी, नक्षलवादी कारवाया, गुन्हेगारी यांमध्ये वाढ झालेली दिसेल. पोलिस, लष्करावर हल्ल्याचे प्रयत्न होतील. या काळात सामाजिक, जातीय तणाव, बंद, निदर्शने, हिंसक घटना यांमधून अशांतता निर्माण होण्याची शक्यता राहील. पुढे शुक्र-शनी युती होत असून, या योगामुळे सोने-चांदी-शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम राहून मोठे चढ-उतार (करेक्शन) झाल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान संभवते.

परदेश व्यापार, आयात-निर्यातीवर बंधने येतील. अमेरिकेच्या टेरिफमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी मंदी अनुभवास येईल. चीन-अमेरिका व्यापार युद्धाचा मोठा फटका युरोपीय देशांना बसण्याची शक्यता राहील. काही देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धाच्या घटना होण्याची शक्यता पुढील काळात निर्माण होईल. इराण-अमेरिका, रशिया-युक्रेन, इस्राईल यांच्यातील तणाव वाढल्याची शक्यता राहील.

याकाळात मोठ्या देशांना अतिरेकी संघटनांचा धोका निर्माण होऊन प्रमुख व्यक्तींवर प्राणघातक हल्ले होतील. शुक्र-शनी युतीमुळे रुपयांचे मूल्य घसरण्याची शक्यता असून वाढत्या कर प्रणालीमुळे व्यापारातील फायद्यात घट होऊन अनेक व्यापारी, उद्योगपती कर्जबाजारी होण्याची शक्यता असून, उत्पन्नात घट होईल. या योगामुळे महागाईत मोठी वाढ संभवते. प्रवास, हॉटेल, हॉस्पिटल, दवाखाने, औषधे यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल.

या काळात प्रवास, दळणवळण, व्हिसा, पासपोर्ट, विमान, रेल्वे, एसटी या प्रकारच्या सेवा विस्कळित होतील. इंटरनेटसारख्या सेवेत खंड पडेल. अवकाश यंत्रणेमध्ये बिघाड किंवा अडथळे येतील. या योगामुळे मोठे व्यापारी, उद्योगपती, राजकीय व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाया किंवा तुरुंगवास किंवा मृत्यूच्या घटना संभवतात. फसवणूक, भ्रष्टाचार, अपहरण, आत्महत्या, सायबर क्राईम या काळात वाढण्याची शक्यता राहील.

साप्ताहिक राशिभविष्य

१९ ते २५ एप्रिल २०२५

मेष : राशीतील रवीचे भ्रमण व्यवसायातील आरोग्य प्राप्तीसाठी अनुकूल राहील. मोठा अधिकार, प्रमोशन मिळेल. नोकरी-व्यवसायात गोंधळाची स्थिती राहील. बदली किंवा दूरचे प्रवास यांचे नियोजन कराल.

वृषभ : १२व्या स्थानात रवीचे आगमन झाले आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीसाठी प्रवास होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला नवीन नोकरी, व्यवसायाची संधी मिळेल. येणी वसूल होण्यासाठी विलंब होईल.

मिथुन : लाभातील रवीचे भ्रमण मोठ्या व्यक्तींचा सहवास घडविणारे राहील. राजकीय-सामाजिक व्यक्तींकडून मदत मिळेल. कुटुंबातील कलह टाळावा. नोकरी-व्यवसायात संभ्रमावस्था राहील. मात्र, मोठे पद, अधिकार, प्रतिष्ठा मिळेल.

कर्क : दशमातील रवीचे भ्रमण राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठे पद, प्रतिष्ठा देणारे राहील. नोकरीत प्रमोशनचे योग येतील. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. घरातील वातावरण गरम राहील. कलाकारांना प्रसिद्धी, पुरस्कार मिळतील.

सिंह : भाग्य स्थानातील रवीचे भ्रमण नव्या नोकरीची संधी देणारे राहील. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीमध्ये मनस्ताप संभवतो. हाताखालचे नोकर त्रास देतील. घर, वाहन दुरूस्तीसाठी खर्च होईल.

कन्या : अष्टमातील रवीचे भ्रमण आरोग्यासाठी प्रतिकूल राहील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. प्रेमप्रकरणात कटकटी होतील. तरुणांचे विवाह जमतील. मात्र, विवाह जमविताना फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी

तूळ : कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्णय होतील. निवडणुकीत मोठे यश मिळेल. मात्र, घरातील वातावरण अशांत राहील. हाताखालील नोकर वर्गाकडून मनस्ताप संभवतो, चोरांपासून सावध राहावे. नोकरीनिमित्त प्रवास होतील.

वृश्चिक : षष्टातील रवीचे भ्रमण तरुणांना नोकरी देणारे राहील. सरकारी नोकरीसाठी अनुकूल काळ राहील. प्रवासात मनस्ताप संभवतो. घर, वाहन खरेदी-विक्रीसाठी अनुकूल काळ. शेअर मार्केटमध्ये नुकसान संभवते. संततीबाबत चिंता राहील.

धनू : पंचमातील रवीचे भ्रमण मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. कुटुंबांत कलह निर्माण होईल. घर, वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ राहील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील.

मकर : चतुर्थातील रवीचे भ्रमण जागा, वाहन खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ राहील. जोडीदाराशी वादविवाद संभवतात. कोर्ट-कचेरीमध्ये मनस्ताप संभवतो. छोटे प्रवास, सहली यातून आनंद मिळेल. भावंडे, नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील.

कुंभ : तृतीय स्थानी रवीचे आगमन प्रवास घडविणारे राहील. नावलौकिक, पदवी पुरस्कार प्राप्त होतील. हितशत्रू, विरोधकांवर मात कराल. मोठे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये मनस्ताप संभवतो. मात्र, उत्पन्नात वाढ होईल.

मीन : धनस्थानातील रवीचे भ्रमण कुटुंबात कलह निर्माण करणारा राहील. डोळ्यांची काळजी घ्यावी. मुलांकडून मनस्ताप संभवतो. तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होईल. कोर्टकचेरीत चांगला निर्णय होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT