India Pakistan Conflict: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून २८ एप्रिल ते १२ मे या दरम्यान या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची दाट शक्यता आहे. भारताकडून हवाई किंवा सागरी मार्गाने प्रतिहल्ला होण्याची शक्यता आहे. भविष्यात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैनिकांकडून जोरदार प्रयत्न होतील.
भविष्यात काश्मीर व उत्तर भारताच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये आणल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही. १२ मे पर्यंतचा काळ भारतासाठी अतिदक्षतेचा राहणार असून, विशेषतः उत्तर भारतासह इतर राज्यांत स्फोटक घटना, दहशतवादी कारवाया, भूकंप, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, भूस्खलन या माध्यमातून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. पाकिस्तानला चोख उत्तर देताना देशातील महत्त्वाच्या शहरांना ‘हाय अलर्ट’ लागू होईल.
भारताच्या लष्करी कारवायांना पाकिस्तानकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सीमेवर युद्धासारखी स्थिती पुढील महिनाभर कायम राहू शकते. सीमेनजीक जवान व सीमेजवळील प्रदेशांवर हल्ले होण्याची शक्यता राहील. मीन राशीतील ग्रहांच्या गर्दीमुळे भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईला जगभरातील अनेक देशांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, दहशतवादाविरोधात सर्व प्रमुख देशांचा भारताला पाठिंबा मिळेल. दहशतवादाबरोबरच अमेरिका-चीन व्यापार युद्धावरही आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन होईल. अनेक देश एकत्र येऊन प्रत्यक्ष युद्ध, व्यापार युद्धावर चर्चा होण्याची शक्यता राहील.
सहा जूनपर्यंत मंगळ,कर्क राशीत भ्रमण करणार आहे. या काळात भूकंप, अतिवृष्टी किंवा युद्धामुळे घरांची पडझड, आगीचे अपघात, रेल्वे-वाहन अपघात, पूर-अतिवृष्टी या माध्यमातून हानी संभवते. पाकिस्तानचे पाणी अडविण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानकडून जोरदार प्रतिकार होऊ शकतो. कर्केच्या मंगळामुळे देशातील अनेक भागांत अतिउष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, पाण्याचा तुटवडा पडेल. या परिस्थितीचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होणार असून, शेअर बाजारात अस्थिरता व पडझड सुरू राहील. याचा उलट परिणाम सोन्या-चांदीच्या भावामध्ये वाढ होऊ शकते.
उत्तर भारत व काश्मीरमधील परिस्थितीचा पूर्वेकडील प्रदेशावर परिणाम होण्याची शक्यता राहील. या काळात पश्चिम बंगाल, बांगलादेशात हिंसाचार उसळण्याची शक्यता आहे. पूर्व, आग्नेयेकडील देशांत हिंसाचार, स्फोटक घटना, भूकंप, अवकाळी पाऊस, त्सुनामी यांसारख्या घटनांमधून हानी संभवते. ईशान्य भारताबरोबर थायलंड, मलेशिया, म्यानमार, जपान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया या भागात भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता राहील.
२८ एप्रिलच्या अमांत कुंडलीमध्ये लग्न-सप्रमातून मकर- कर्क राशीतून मंगळ-प्लुटो अंशात्मक प्रतियोग झाला असल्यामुळे, अतिरेकी कारवाया, नैसर्गिक आपत्ती व युद्धासारख्या घटना उत्तर भारत, काश्मीर, दिल्ली अशा ठिकाणी होण्याचे भाकीत या सदरामध्ये या पूर्वीच्या लेखातून वर्तविण्यात आले होते. या घटना आपणास अनुभवास आल्या आहेत. १५ एप्रिलच्या मेष संक्रमण कुंडलीमधून एप्रिल ते जुलै असा तीन महिन्यांचा कालावधी या घटनांसाठी पोषक असल्याचे सातत्याने वर्तविले आहे. याचा अर्थ भारत-पाकिस्तानमधील युद्धाचे सावट १५ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, सीमेवरील तणाव पुढील काळात कायम राहू शकतो.
मेष : चतुर्थातील चंद्र-मंगळ युतीमुळे पूर्वार्धात घरातील वातावरण गरम राहील. वाहन जपून चालवावे. संततीच्या दृष्टीने चांगली घटना घडेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वृषभ : धाडसी निर्णय घ्याल. पराक्रम, कर्तृत्वाची संधी मिळेल. शत्रूवर मात होईल. स्पर्धा, निवडणुकीत यश मिळेल. घर, वाहन खरेदी होईल. उत्तरार्धात संगीत, कला, मनोरंजनाचा आनंद घ्याल.
मिथुन : कुटुंबात कलह संभवतो. स्पष्टवक्तेपणामुळे वाद होतील. डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. नातेवाइकांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. कर्क : राशीतील चंद्र-मंगळ युतीमुळे आक्रमक व्हाल. मानसिक स्वास्थ्य खराब राहील. उत्तरार्धात कौटुंबिक कामात यश मिळेल. सरकारी कामे होतील. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल.
सिंह : रस्त्यावरची भांडणे टाळावीत. कर्जाचा ताण राहील. किमती वस्तूंची काळजी घ्यावी. मात्र, आरोग्यात चांगली सुधारणा होईल. नोकरीत बढती प्रमोशन मिळेल. उत्तरार्धात पैशांची कामे होतील.
कन्या : वसुलीसाठी कटकटी होतील. मात्र शत्रूवर विजय मिळेल. स्पर्धा, निवडणुकीत यश मिळेल. मित्रांशी मतभेद संभवतात. उत्तरार्धात मोठा प्रवास होईल. लागेल. तरुणांचे विवाह जमतील.
तूळ : कामाचा झपाटा वाढेल. मोठी कामे मार्गी लागतील. धाडसी निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार वाढेल. जोडीदाराचे प्रमोशन होईल. उत्तरार्धात मोठे खर्च होतील. वृश्चिक : भाग्यातील चंद्र-मंगळ युती मोठी संधी निर्माण करणारी राहील. तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळेल. जुनी येणी वसूल होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास, सहकार्य मिळेल.
धनू : प्रवास जपून करावेत. पायाचे दुखणे संभवतात. घरातील वातावरण खराब राहील, मात्र उत्तरार्धात सरकारी कामे होतील. मोठा मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात मनासारखे बदल होतील.
मकर : सप्ताहातील चंद्र-मंगळ युती जोडीदाराशी तणाव निर्माण करणारी राहील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. उत्तरार्धात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.
कुंभ : हाताखालच्या लोकांकडून मनस्ताप संभवतो. बदली-बदल झाल्याने घरापासून दूर जावे लागेल. अचानक मोठे लाभ होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी, पोटाचे विकार संभवतात.
मीन : पंचमातील चंद्र-मंगळ युती मुलांकडून मनस्ताप देणारी राहील. विद्यार्थ्यांना परीक्षा, प्रवेश यामधून कटकटी संभवतात. शेअर मार्केटपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात मतभेद संभवतात
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.