UPSC सारखी अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश मिळवणाऱ्या उमेदवारांनाही प्रशिक्षणाच्या काळात कठीण आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून (RTI) मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील 5 वर्षांत एकूण 24 IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी प्रशिक्षणादरम्यान घेण्यात आलेल्या एक किंवा अधिक परीक्षांमध्ये अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 14 विद्यार्थी 2025 आणि 2026 या दोन वर्षांत नोंदवण्यात आली आहेत.
IAS पदासाठी निवड झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना उत्तराखंडमधील मसुरी येथे असलेल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये (LBSNAA) दोन वर्षांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षेसाठी अर्ज करतात. त्यापैकी सुमारे 5 लाख उमेदवार परीक्षा देतात, मात्र अंतिम निवड होऊन केवळ 182 ते 184 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळतो.
या प्रशिक्षण काळात अधिकाऱ्यांची विविध विषयांवर परीक्षा घेतली जाते. भारतीय राज्यघटना, कायदा, अर्थव्यवस्था, सार्वजनिक प्रशासन, व्यवस्थापन, राज्यशास्त्र आणि वर्तनशास्त्र यांसारख्या विषयांचा त्यात समावेश असतो. प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असते.
अनेक प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी नियुक्त राज्यातील स्थानिक भाषेची परीक्षा ही मोठे आव्हान ठरते. त्यामुळे काही जणांना पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. मात्र नंतरच्या पुनर्परीक्षांमध्ये बहुतेक अधिकारी पात्र ठरतात. गेल्या काही वर्षांत प्रशिक्षणातील मूल्यमापन आणि अभ्यासक्रम अधिक कठोर करण्यात आल्याची माहितीही काही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
RTI मधून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. या कालावधीत 14 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यामध्ये 2022 बॅचमधील 6 आणि 2025 बॅचमधील 8 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कमी उपस्थिती, शारीरिक प्रशिक्षणात गैरहजेरी, वर्गात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आणि अकादमीच्या नियमांचे उल्लंघन ही कारवाईमागील प्रमुख कारणे होती.
अकादमीच्या माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नांची कोणतीही निश्चित मर्यादा नाही. मात्र सेवेत रुजू झाल्यानंतर 4 वर्षांच्या आत सर्व विषयांमध्ये यश मिळवणे आवश्यक असते. 2018 ते 2026 या कालावधीत सर्व IAS प्रशिक्षणार्थींचा अंतिम निकाल 100 टक्के राहिला असून, केवळ परीक्षेत अपयशी ठरल्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याला सेवेतून वगळण्यात आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.