Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
प्रशासन

अजित पवार यांनी सांगूनही प्रशासन हलेना : MPSC उत्तीर्णांचे हाल संपेना

महेश जगताप

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेतून निवड झालेल्या ४१६ उमेदवारांच्या दीड वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लागत नसल्याचे हे विद्यार्थी हतबल झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ,सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatrey Bharane) यांनी या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात, असा आदेश दिला असतानाही सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही गेल्या महिन्यात या नियुक्तीच्या फाइलवर सही झाली आहे. कागद पडताळणी , वैद्यकीय तपासणी उमेदवारांची नियुक्ती केल्यानंतरही होऊ शकत असताना सौनिक यांनी सर्व विद्यार्थ्यांची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मी नियुक्ती देणार असे आडमुठेपणाचे धोरण आखले आहे.

राज्यसेवा परीक्षेतून वर्ग एक आणि वर्ग दोन या पदांवर २०२० मध्ये अंतिम निवड झालेल्या ४१३ उमेदवारांना गेल्या दीड वर्षांपासूनही, कोरोना साथ, मराठा आरक्षण, सुधारित निकाल आणि आत्ता काही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट अजून मिळाले नाहीत म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती रोखून धरली आहे.

निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. उमेदवारांनी वेळोवेळी पवार, भरणे यांचा पाठपुरावा केला आहे .प्रत्येक वेळी आठ-दहा दिवसांत तुम्हला जॉइनिंग देऊ, असे असे आश्वासन देण्यात आले. पवार, भरणे यांनी सामान्य प्रशासनाच्या सौनिक यांना वेळोवेळी उमेदवारांच्या नियुक्तीसाठी सूचना देऊनही सौनिक यांनी कानाडोळा केला असल्याचा आरोप निवड झालेल्या उमेदवारांनी केला आहे.

या आधीच्या नियुक्त झालेल्या सर्व बॅचेसची कागदपत्रे पडताळणी व वैद्यकीय तपासणी नियुक्ती झाल्यानंतरही झाल्या आहेत. आधीच दीड वर्ष नियुक्तीसाठी उशीर झाला आहे. मग आमच्याच बॅचवर सर्व प्रयोग का करत आहेत ,आम्ही आमची उमेदीची सहा ,सात वर्षे घालवून या नोकऱ्या मिळवल्या आहेत. पुन्हा नियुक्त्यासाठी आम्ही वाटच पाहत बसायचे का असा सवाल पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झालेले रवींद्र भोसले यांनी केला आहे .

या आधीच्या बॅचेसच काय झालं मला माहित नाही. कागद पडताळणी ,मेडिकल चेकअप झाल्याशिवाय या बॅचला नियुक्ती मिळणार नाही .लवकरात लवकर कागद पडताळणी आणि मेडिकल चेकअप होईल . त्यानंतरच नियुक्त्या होतील, अशी भूमिका सुजाता सौनिक यांनी मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT