ACB In Action Mode  Sarkarnama
प्रशासन

ACB Action News : कोटी रूपयांची लाच मागणारा लाचखोर पीआय खाडे पोलिसांना शरण !

Chaitanya Machale

Beed News : एक कोटी रूपयांची लाच मागून मध्यस्थांमार्फत पाच लाख रूपये स्वीकारल्याचा गुन्हा दाखल झालेला लाचखोर पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे लाच लुचपत विभागासमोर हजर झाला आहे. लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचखोर पोलिस निरीक्षक खाडे फरार झाला होता. तो एसीबीसमोर हजर झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बीड शहरातील मॉ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे याने संबधितांकडे तब्बल एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. यामध्ये 10 लाख रूपये देण्याबाबत तडजोड करण्यात आली.

यामधील 5 लाख रूपये खाडे याने मध्यस्थी कुशल जैन याच्या मार्फत स्वीकारली होती. या प्रकरणात लाच लुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा करत लाच लुचपत विभागाने हरिभाऊ खाडे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर खाडे फरार झाला होता. त्यानंतर लाचलुचपत पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये एक कोटी रूपयांची रोख रक्कम मिळाली. तसेच साडेपाच किलो चांदी, 90 तोळे सोने याबरोबरच बीड, इंदापूर, परळी, बारामती (Baramati) येथे त्याच्या नावावर व्यापारी गाळे तसेच फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. पथकाने त्याच्या घरात सापडलेली कागदपत्रे तपासासाठी जप्त केली होती. त्याचा शोध घेण्यासाठी पुढील कार्यवाही एसीबीने सुरू केली होती.

मध्यस्थीच्या मार्फत पाच लाख रूपयांची लाच घेऊन त्यानंतर फरार झालेल्या लाचखोर पोलिस निरीक्षक खाडे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची (Police) चार पथके तैनात करण्यात आली होती. खाडे कोठे जाऊ शकतो, याचा तपास करून यासाठी पथके नेमली होती.

त्यांचा तपास सुरू होता. असे असतानाच लाचखोर खाडे बुधवारी रात्री उशीरा स्वतःहून लाचलुचपत विभागासमोर हजर झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या माहितीला एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

दरम्यान,बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात लाचलुचपत विभागाने आठ जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये लाचखोर पोलिस निरीक्षक खाडे याच्यासह एक पोलिस फौजदार, एक कार्यकारी अभियंता, एक नगररचनाकार अशा अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT