Bribe News
Bribe News  Sarkarnama
प्रशासन

CBI News : लष्कारात भरतीसाठी लाच मागणाऱ्या तत्कालीन लेफ्टनंट कर्नलवर अखेर गुन्हा दाखल

Chaitanya Machale

Pune News : लष्करात भरतीसाठी लाच मागणाऱ्या पुणे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन लेफ्टनंट कर्नल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. लष्करातील दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात लाच मागितल्याचा हा गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

तत्कालीन लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा आणि सुशांत नाहक अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. सुशांत नाहक यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट रचणे, फसवणूक करणे याबरोबरच भ्रष्टाचार विरोधी कलम 7 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडीच ते पावणे तीन वर्षापूर्वी 16 नोव्हेंबर 2021 ला पुणे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील हवालदार सुशांत नाहक आणि नवीन कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनी लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर सीबीआयच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लष्करातील भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती.त्याची तक्रार करण्यात आल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (Court) नाहक आणि कुमार यांच्या मोबाइलमधील चित्रीकरणाचे विश्लेषण करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. या मोबाइलच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीमधून नाहक याने भरती प्रक्रियेत निवड झालेल्या आणि निवड न झालेल्या उमेदवारांकडे पैशाची मागणी केली असल्याचे तपासात उघड झाले होते.

लष्कराच्या भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या एका उमेदवाराकडे 2 लाखांची लाच मागण्यात आली होती. लाच मागितलेल्या या उमेदवाराने याविरोधात सीबीआयकडे तक्रार दिली होती. या तपासामध्ये सुशांत नाहक आणि कर्नल रायझादा यांनी भरती प्रक्रीयेत लाच मागितल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात सिद्ध केले. रायझादा याने निवड झालेल्या उमेदवरांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचेही तपासात समोर आले होते. याबरोबरच ग्रुप सी च्या भरती प्रक्रियेत सुद्धा या दोघांनी गैरप्रकार केल्याचे उघड झाले.

सीबीआयच्या तपासात सुशांत नाहक याने एका उमेदवाराकडून 80 हजार रूपये बँक खात्यात जमा करून घेतले होते. तर त्यानंतर रायझादा यांच्या बँकेच्या खात्यावर 75 हजार रूपये पाठविण्यात आले होते. त्यामुळे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कट रचणे, फसवणूक, तसेच भ्रष्टाचाराच्या विविध कलमान्वये नव्याने हा दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT