Talathi Bharti in Maharashtra Sarkarnama
प्रशासन

Talathi Bharti : तलाठीपदाच्या जाहिरातीत गोंधळात गोंधळ; आयुक्तालयाने मागविला खुलासा !

Talathi Bharti in Maharashtra: राज्यात तलाठी पदासाठी तब्बल 4644 जागांसाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: सध्या राज्यभरात तब्बल चार हजार 644 जागांसाठी तलाठीपदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे. मात्र, त्या आधीच तलाठी भरतीच्या जाहिरातीमध्ये दिव्यांगांच्या आरक्षणातील बदल आणि आरक्षणाबाबतच्या अस्पष्ट उल्लेखामुळे दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्यांवरून आता राज्याच्या दिव्यांग आयुक्तालयाने याबवर आक्षेप घेतला आहे.

राज्यात सध्या चार हजार 644 जागांसाठी तलाठीपदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी 185.76 पदे म्हणजेच 186 पदे आरक्षित ठरतात. मात्र, जाहिरातीमध्ये फक्त 172 पदे राखीव ठेवण्यात आल्याचे आढळून येत असल्याचं दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने म्हटलं आहे.

याबाबतच्या राखीव पदांची परिगणना काही जिल्ह्यांमध्ये चुकीची आढळून आली आहे, असं स्पष्ट करत आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी यासंदर्भात येत्या सात दिवसांत खुलासा मागितला आहे. राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख यांच्याकडून सात दिवसांत खुलासा मागविला आहे.

तसेच जाहिरातीमध्ये जिल्हा निहाय रिक्त पदांचा तपशील दर्शविलेला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव पदांची परिगणना चुकीची आढळून येते. ही परिगणनाही एकूण रिक्त पदांच्या प्रमाणात 4 टक्के प्रमाणे केली नसल्याचे दिसून येते.

जाहिरातीमध्ये शासन निर्णयान्वये तलाठी पदाकरिता पद सुनिश्चितीकरण करण्यात आले असल्याबाबत नमूद केले आहे. मात्र, या शासन निर्णयातील पदांमध्ये तलाठी पदाचा समावेश आढळून येत नाही. जाहिरातीतील दिव्यांग संवर्गनिहाय परिगणना करतांना शासन निर्णयामधील तरतुदीनुसार केली नसल्याचे दिसून येत असल्याचे याबाबतच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय?

अस्थिव्यंग दिव्यांगांना आरक्षण देताना अस्थिव्यंग असा स्पष्ट उल्लेख फक्त तीनच जिल्ह्यातील जाहिरातीत करण्यात आला आहे. तलाठीपदाच्या जाहिरातीच्या एकूण जागांपैकी फक्त चार जागाच अस्थिव्यंग दिव्यांगांना देण्यात आल्या असल्याचं म्हणणं अस्थिव्यंग विद्यार्थ्यांच आहे. त्यामुळे आता यावर प्रशासनाकडून काय निर्णय घेण्यात येतो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT