IPS Shivdeep Lande  Sarkarnama
प्रशासन

दबंग IPS अधिकारी शिवदीप लांडेंना बिहारमध्ये आता कोणती जबाबदारी मिळणार?

मूळचे महाराष्ट्रातील असलेले शिवदीप लांडे (Shivdeep Lande) बिहारमध्येही प्रसिद्ध आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पटणा : दंबग IPS अधिकारी म्हणून देशात ओळखले जाणारे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) यांची पुन्हा बिहारमध्ये उपमहानिरीक्षक (प्रशासन) DIG या पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पोलिस मुख्यालयाकडून त्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच लांडे हे महाराष्ट्रातील आपल्या नोकरीचा कार्यकाळ संपवून बिहारची राजधानी पाटणा येथे पोचले होते. यानंतर लगेचच त्यांना महानिरिक्षक (IG) यांच्याकडून प्रतिनियुक्तिचे पत्र देण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांना कुठल्या ठिकाणचा पदभार दिला जाणार याबाबत निश्चित झालेले नाही. यामुळे हे स्पष्ट होईपर्यंत लांडे हे पाटणा शहरातच वास्तव्यास असणार आहेत. लांडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा मात्र, बिहारमध्ये चांगलीच रंगली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

लांडेंची बिहारमध्ये मोठी लोकप्रियता असून गुन्हेगारांवर त्यांची मोठी वचक आहे. `ऑन द स्पाट अॅक्शन`साठी ते प्रसिद्ध आहेत. यामुळे बिहार येथील नागरिकांकडून त्यांच्या नियुक्तिचे स्वागत केले जात आहे. लांडे हे मूळचे अकोल्याचे असून ते बिहार केडरचे IPS आहेत. आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना आपल्या मूळच्या राज्यात प्रतिनियुक्तीसाठी पाच वर्षांसाठी येता येते. त्यानुसार ते पाच वर्षांपूर्वी 14 नोव्हेंबर 2016 ला महाराष्ट्रात आले होते. सुरवाताली त्यांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बढती झाली. यानंतर दहशतवाद विरोधी पथकात उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याच वेळी त्यांच्याकडे मनसुख हिरेन खून प्रकरणाचा आणि अॅटिंलिया येथे स्फोटके ठेवल्याच्या गुन्ह्याचा तपास आला. मात्र, हा तपास नंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन चांगले काम दाखविण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.

शिवदीप लांडेंनी आपल्या नोकरीची सरुवात ही बिहार मधिल मुंगेर जिल्ह्यातुन केली होती. त्यांची कामाबद्दलची ईमानदारी आणि कर्तव्यनिष्ठा याबाबत आजही येथील नागरिकांमध्ये चर्चा रंगतात. मुंगेर जिल्ह्यात त्यांनी दोन वर्ष केलेल्या कार्यकाळात प्रभावित केले होते. यामुळे त्यांना मुंगेरची जबाबदारी दिल्यास येथील वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घातला जाऊ शकतो अशी चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे.

शिवदीप लांडे हे जेव्हा पटणा शहर अधिक्षक (SP) म्हणून काम करत होते. तेंव्हा ब्रॅडेंड कंपनीच्या नावावर नकली सामान विकणारे, नकली नोटा छापणारे, बोगस औषधी विक्रेत्यांवर एक मोहीम चालवत त्यांच्यावर बेधडकपणे कारवाई केली होती. तसेच, पटणा शहरातील अशोक राजपथावरील एका कपड्याच्या शोरूम मालकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी भीतीपोटी येथील दुकाने बंद ठेवली होती. तेव्हा लांडे यांनी हत्या करणाऱ्या गुन्हेंगारांना पकडून याच परिसरातच नेऊन चांगलेच चोपले होते. यानंतर येथील दुकाने सुरू झाली होती. याबरोबरच त्यांनी पोलिस अधिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतांना वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांना जेलमध्ये टाकले होते. त्यांची आता पुन्हा एकदा बिहारला वापसी झाल्याने येथील नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात मनासारखे काम न करता आल्याची खंत

दरम्यान, गेल्यावर्षी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. मी Maybe today I'm silent, hurt... but.. (मी सध्या शांत आहे, व्यतिथ आहे..पण) असे त्यांनी म्हटले होते. महाराष्ट्रात त्यांना चांगले पोस्टिंग न मिळाल्याबद्दलची व्यथा तर त्यांनी बोलून दाखवली नव्हती ना, अशी शंका त्या वेळी घेतली होती. बिहारसारख्या राज्यात त्यांच्या कामगिरीने ते देशात गाजले. महाराष्ट्रात मात्र, त्यांना त्या मानाने फारसे करता आले नाही, अशी खंत त्यांचे हितचिंतक बोलून दाखवतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT