Dhule News : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका निवृत्त सैनिकाला प्रशिक्षणादरम्यान दिलेल्या धावण्याच्या शिक्षेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चुकीची शिक्षा म्हणून दौड लावत असताना माजी सैनिकाला त्रास सुरु झाला. ते जमिनीवर कोसळले, त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, संबधित अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक शिक्षा दिल्याचा आरोप मृत माजी सैनिकाच्या पत्नीने केला आहे. तसेच या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी पत्नीने केली आहे. पंकज लक्ष्मणराव घावट (४३) असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते मुळचे अमरावतीच्या सावळापूर येथील आहे.
सैन्य दलातील निवृत्त झाल्यानंतर पंकज यांची नागपूर पोलिसांत निवड झाली होती. धुळे येथील पोलिस अकादमीत ते प्रशिक्षण घेत होते. ९ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी संपण्यास अवघे १० दिवस शिल्लक असताना ही दुर्देवी घटना घडली.
२८ मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यासह २५ प्रशिक्षणार्थींना दौड लावण्याची शिक्षा दिली. पंकज यांची प्रकृती ठिक नसल्याचे त्यांनी सांगूनही त्यांना शिक्षेत सुट मिळाली नाही. दरम्यान, दौड लावत असताना ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
तब्बल २६ किलोमीटर दौड लावण्याची शिक्षा त्यांना दिली. धावण्यास त्रास होत असल्याचे सांगूनही संबधित अधिकाऱ्याने ऐकलं नाही. असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
पंकज हे सैन्य दलातील आर्टिलरी गनर रेजिमेंटमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर दहा महिन्यांपूर्वी नागपूर शहर पोलीस दलामध्ये भरती झाले होते. त्यांचे धुळे येथील प्रशिक्षण ९ जून ला संपणार होते. त्यानंतर ते नागपूर पोलिस दलात कार्यरत होणार होते.
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या एकूण ६४९ नवप्रविष्ठ पोलीस शिपाई प्रशिक्षण घेत आहेत. 9 महिन्यांचे हे बेसिक ट्रेनिंग दररोज सकाळी पावणे सहा वाजेपासून सुरू होते. यामध्ये रनिंग, शारीरिक प्रशिक्षण, परेड आणि विविध पोलिस कामकाजाची माहिती दिली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.