District Election Administration Sarkarnama
प्रशासन

District Election Administration News : मतदानाचा 'तो' मेसेज दिशाभूल करणारा, एकावर गुन्हा दाखल, कारवाई सुरू !

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असून मतदानाबाबत चुकीचे आणि नागरिकांची फसवणूक करणारे मेसेज सोशल मिडीयावरून व्हायरल होत आहे. अशा चुकीच्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करताना चुकीचे मेसेज पाठविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास जिल्हा निवडणूक प्रशासनाने सुरुवात केली आहे.

मतदार यादीत नाव नसल्यास निवडणूक आयोगाचा 17 क्रमांकाचा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे, अशा आशयाचा खोटा मेसेज गेले काही दिवसांपासून व्हायरल होत होता. याची शहानिशा करून हा मेसेज व्हाट्सअप वरून पाठविल्याने जिल्हा प्रशासनाने एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. अशा प्रकारचे चुकीचे मेसेज पाठवून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारयादीत नाव नसल्यास विशिष्ट अर्ज भरून मतदार (Voter) ओळखपत्र दाखवून मतदान करता येण्याबाबत व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहे. यामुळे नागरिक तसेच प्रशासन या दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे लागत आहे. या मेसेजमुळे हडपसर येथील मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी देखील केली होती. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. असे चुकीचे मेसेज जिल्ह्यात पाठविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या मेसेजपासून सावध रहावे,अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच असे मेसेज पुढे पाठवू नयेत, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) सूचनेनुसार नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदार संघात गेली वर्षभर काम करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. मतदाराचे नाव वगळणी करताना नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब ही करण्यात आलेला आहे. ज्या नागरिकाचे अंतिम मतदार यादीत नाव नसेल त्या नागरिकाला निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 12 पुराव्यापैकी एक कागदपत्र दाखवून नागरिकांना आपले मतदान करता येईल, असे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बेकायदा जमाव जमविण्यास बंदी

पुणे शहर तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (13 मे रोजी) लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शनिवारी (11 मे) सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त प्रविण पवार यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर व हडपसर विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या 48 तास अगोदर पासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT