Hit & Run Talegaon Sarkarnama
प्रशासन

Hit and Run Case Talegaon : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण तळेगावचे सीओ पाटील यांच्यावर शेकणार, मुदतपूर्व उचलबांगडी होणार?

Shivsena Vs Ncp Ajit Pawar : खासदार श्रीरंग बारणेंनी आणलेल्या सीओ पाटलांची तातडीने बदली करण्याची मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.

Uttam Kute

Pimpri News : 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणातील तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी (सीओ) एन. के. पाटील यांची मुदतपूर्व बदली होण्याची शक्यता आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव येथे आणलेल्या पाटलांची बदली करून त्यांना सस्पेंड करण्याची मागणी अजित पवार राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे.दरम्यान,ही बदली झाली, तर नगरपरिषदेच्या सीओंच्या मुदतपूर्व बदलीचे सत्र हे या निमित्ताने सुरुच राहणार आहे.

मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवून दोन वाहनांना ठोकरल्याने पाटलांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या शनिवारी 1 जूनला हा अपघात झाला होता. हा अपघात करून ते पळून गेले.घराचा दरवाजा बंद करून ते बसले.तीन तासांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.दारू पिऊन गाडी चालविल्याचे त्यांच्या रक्तचाचणीत दिसून आल्याने त्यांच्या अडचणीत नंतर वाढ झाली.दरम्यान, शेळकेंनी त्यांच्या बदलीसह निलंबनासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्र्यांनाही पत्र दिल्याने ते आणखी गोत्यात आता आले आहे. शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्या पाटलांच्या बदलीची दुसरी मागणीही मंजूर होण्याची शक्यता आहे.

पुण्यात एक न्याय,तर तळेगावात दुसरा का ?

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी चालक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पालकांना पोलिसांनी अटक केली.अद्याप ते कोठडीत आहेत.मात्र, तसे तळेगावात सीओ पाटलांच्या बाबतीत झाले नाही.या अपघातात कुणी जखमी वा मृत न झाल्याने तसेच सबंधित गुन्ह्यात फक्त दोन वर्षे शिक्षेची तरतूद असल्याने पाटील यांना अटक केली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. वर्षाच्या आत शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यात अटकेची गरज नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याने सीओ पाटील यांना अटक केली नसल्याचे तळेगाव दाभाडे पोलिस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांनीही थोड्या वेळापूर्वी सरकारनामाला सांगितले. आता त्यांच्याविरुद्ध कोर्टात थेट चार्जशीट दाखल करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शेळके पाटील जानी दुश्मन

तळेगावचे कार्यक्षम सीओ विजय सरनाईक यांची मुदतपूर्व बदली होऊन तेथे पाटील गेल्यावर्षी 21 एप्रिलला आले आहेत. मात्र,त्यांच्या काळात नागरिकांच्या तक्रारी खूपच वाढल्या. त्यामुळे त्यांनी नगरपरिषदेचा बट्याबोळ केल्याचा आरोप करीत त्यांच्या बदलीची मागणी शेळकेंनी गेल्यावर्षी 3 ऑक्टोबरला केली होती. सरनाईकांच्या बदलीची शिफारस करून पाटलांना सीओ म्हणून आणून बारणे घरात बसल्याचा हल्लाबोलही त्यांनी त्यावेळी केला होता. त्यांच्या मागणीनंतर 1 डिसेंबरला पाटील यांची बदली झाली. पण, तिला त्यांनी मॅटमध्ये आव्हान दिल्यानंतर ते काही दिवसांतच 7 डिसेंबरला पुन्हा तळेगावात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी दारू पिऊन नुकताच अपघात केल्याने आता पुन्हा त्यांची बदली होण्याची शक्यता वाढली आहे.

शेळकेंचा पाटलांवर पुन्हा हल्लाबोल

दरम्यान, आज शनिवारी आमदार शेळकेंनी सीओ पाटलांचा पुन्हा समाचार घेतला. या भ्रष्ट, निष्क्रीय अधिकाऱ्यामुळे तळेगावकर अगोदरच त्रस्त असताना त्यांनी नवा पराक्रम केल्याने त्यांच्या बदलीची पुन्हा मागणी केल्याचे शेळकेंनी सांगितले. दुसरीकडे तळेगावकरांनीही पाटलांच्या या नव्या कारनाम्याविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. पण, ते न करता त्यांना नगरपरिषद कार्यालयात येऊ न देण्याची भूमिका शहरवासियांनी घ्यावी,असे शेळके म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT