राम काळगे
Latur News : जिल्ह्यातील येळवस अर्थात वेळ अमावस्या आता लातूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख झाली आहे, ती सर्वदूर पोहोचली आहे. ही ओळख आणखी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी औसा तालुक्यातील येलोरी येथील शेतात जाऊन सप्तमातृकाचे पूजन करून आंबिल, भज्जीचा आस्वाद घेतला. नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंढे लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असून त्यातील वेळाअमावस्या हा लातूर जिल्ह्यातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक रान महोत्सव आहे. या महोत्सवाबद्दल राज्यातील लोकांना आकर्षण निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात विशेष नियोजन करून हा रान महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात प्रमोट करता येईल का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वर्षा ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
मुंबईचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचे औसा तालुक्यातील येलोरी हे गाव असून त्यांच्या शेतात ही वेळअमावस्या सर्वांनी साजरी केली. यावेळी गावचे सरपंच, नागरिक उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जिवनातील महत्त्वाचा सण म्हणून वेळआमवश्याकडे बघितले जाते. रब्बीच्या पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा सण उत्सव शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते.
मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात शेतकरी साजरा करतात. हरभरा, वाळके, वटाना, कांदापात, मेथी, लसूणपात, डहाळे, तूर अशा विविध धान्यापासून एकत्रित बेसनच्या पिठामध्ये आंबट चिंच घालून भज्जी बनवले जाते. ताकापासून आंबिल, ज्वारी पिठापासून लहान लहान रोडगे (भाकरी), बाजरी भाकर, उंडे, खिचडा, खीर असे पदार्थ या दिवशी वनभोजनात समाविष्ट असतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकारण्यांनी साजरी केली वेळ अमावस्या
माजी केंद्रीयमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), माजी मुख्यमंत्री कै. शिवाजीराव पाटील निलंगेकर (shivajirao patil) वेळ अमावस्या आवर्जून साजरी करायचे. ही परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीनेही सुरू ठेवली असून गुरुवारी देशमुख आणि निलंगेकर कुटुंबासह जिल्ह्यातील सर्वच राजकारण्यांनी वेळ अमावस्या साजरी केली.
(Edited By sachin waghmare)
R...