Vilasrao Deshmukh Death Anniversary: विलासराव देशमुख म्हटलं की त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व समोर येतं. त्यांची बोलण्याची स्टाईल. विलासराव जिथं सभेला गेले ती सभा त्यांनी जिंकली. विलासरावांची सभा म्हणजे हशा आणि टाळ्या यांचा मिलाफ असे. विलासराव आज नाहीत पण त्यांच्या आठवणी आजघडीलाही ताज्या करुन सांगितल्या जातात. त्यात विलासरावांच्या वैयक्तिक आयुष्यपासून सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावरही जशास तसा डोळ्यापुढे येतो.
या साऱ्यात काँग्रेसचे नेते माजी आमदार उल्हास पवार हे तर विलासरावांच्या जुन्या आठवणी किस्से सांगून विलासराव आपल्यातच आहेत हे जाणवून देतात. विलासराव हे मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्रीपदापर्यंत गेले तरी त्यांच्यातला साधेपणा नेहमीच नजरेत भरायचा. विलासराव हे खवय्ये होते ; त्यांना पुरणाची पोळी आणि कटाची आमटी खूप आवडायची. अशी आठवण माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितली आहे.
"विलासराव देशमुख माझे जवळचे मित्र. त्यांची आणि माझी मैत्री म्हणजे पूर्व जन्माची पुण्याई असं म्हणावं लागेल. माझ्यावर आणि माझ्या आईवर त्यांचे खूप प्रेम होते. ते मुख्यमंत्री होऊन जेव्हा पहिल्यांदा पुणे दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा माझ्या आईचे दर्शन घेतले. तेव्हा माझ्या आईंनी त्यांना दिलेले आशीर्वाद तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो",अशा शब्दात विलासराव देशमुख यांचे मित्र माजी आमदार उल्हास पवार यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सरकारनामाने उल्हास पवार यांच्याशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विलासराव देशमुख आणि त्यांच्यातील मैत्रीचे किस्से सांगितले. "विलासराव देशमुख शिक्षणाच्यानिमित्त पुण्यात आले. पुण्यात त्यांची आणि माझी मैत्री झाली. आम्ही तेव्हा नाना पेठेत राहत होतो. आमच्या घरात बसायला पुरेशी जागा नव्हती. घराच्या बाहेर सिमेंटचे बाकडे होते त्यावर बसून आम्ही तासन् तास गप्पा मारत बसायचो. पुढं विलासराव मुख्यमंत्री झाले, तेव्हाही त्यांना ते दिवस आठवत असत."असे उल्हास पवार यांनी सांगितले.
"विलासराव देशमुख यांना पुरणपोळी खूप आवडत असे. मी त्यांना सणाच्या दिवशी जेवायला बोलवत असे. त्यांना माझ्या आईच्या हातची पुरणपोळी आणि कटाची आमटी त्यांना खूप आवडायची. एखाद्या सणाला जर ते लातूरला गेले असतील तर माझ्या आईला त्यांची आठवण यायची.. पुढे विलासराव राजकारणात गेले. आमदार, मंत्री झाले पण आमच्या कुटुंबाशी त्यांचा जिव्हाळा कायम राहिला. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा पुणे दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी पहिल्यांदा माझ्या आईची भेट घेऊन तिचे आशीर्वाद घेतले आणि नंतर ते बाळासाहेब भारदे यांची भेट घ्यायला गेले."
"विद्यार्थीदशेत असताना त्यांना ज्या आईने लळा लावला त्या आईचे दर्शन घेऊन त्यांनी जिव्हाळा व्यक्त केला होता. अशा सुसंस्कृत आणि मनमिळाऊ मित्राची नेहमी आठवण येते.."असे पवार म्हणाले.