Sitaram Kunte  Sarkarnama
प्रशासन

निवृत्ती आठवड्यावर आली अन् मुख्य सचिव कुंटेंना मुदतवाढ मिळाली

राज्य सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. कुंटे यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपत होता. कार्यकाळ संपण्यास आठवड्याचा कालावधी राहिला असताना त्यांना सरकारने 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पदासाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती.

राज्य सरकारने 28 फेब्रुवारीला कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. कुंटे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. कुंटे यांच्या आधी मुख्य सचिव असलेले संजयकुमार यांना निवृत्तीनंतर महावितरण नियामक आयोगावर नियुक्त करण्यात आले होते. परंतु, सध्या कोणतेही महामंडळ रिक्त नसल्याने कुंटे यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागली असती. कारण फेब्रुवारी अखेर सेवेचा हक्क मुख्य आयुक्त प्रमुख स्वाधीन क्षत्रीय निवृत्त होत आहेत. परंतु, कुंटे यांना मुदतवाढ देऊन राज्य सरकारने हा तिढा सोडवला आहे. कुंटे यांचा कार्यकाळ आता फेब्रुवारी महिन्यात संपेल. त्यावेळी निवृत्तीनंतर त्यांना लगेचच सरकारी महामंडळ मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुंटे हे आधी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभागात कार्यरत होते. 1985 च्या बॅचचे आयएएस असलेले कुंटे यांना मुख्य सचिवरपदाचा आतापर्यंत नऊ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यांनी पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त या तीनही पदांवर काम केले. तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

संजयकुमार यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्तीच्या वेळीच कुंटे यांचेही नाव चर्चेत होते. संजयकुमार हे त्यांना वरिष्ठ असल्याने कुंटे यांचे नाव मागे पडले होते. कुंटे यांच्या नावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा होता मात्र, राष्ट्रवादीचा त्यांना विरोध होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील कुंटेंची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT