Department Food Supply and Consumer Protection Sarkarnama
प्रशासन

Government Job: सरकारी नोकरीची संधी; 'या' विभागाने काढली 345 जागांची बंपर भरती

Department Food Supply and Consumer Protection: सहा प्रादेशिक विभागांसाठी भरती होत आहे.

Anand Surwase

सुशिक्षित तरुणांसाठी सरकारी नोकरीची एक नामी संधी आली आहे. राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती राज्याच्या सहा प्रादेशिक विभागासाठी होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीप्रक्रियेमध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत, अर्जाची अंतिम मुदत किती तारखेपर्यंत आहे, तसेच यासाठी अर्जाचे शुल्क किती आकारले जाणार आहे? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महाराष्ट्र शासनाच्या अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने गट क पदासाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात क्रमांक प्र.क्र 63/2022 नुसार या भरतीमध्ये पुरवठा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 345 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारंना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पुरवठा निरीक्षक या पदासाठी वेतन श्रेणी ही 29,200 – 92,300 अशी आहे. तर लिपिक पदासाठी 25,500-81,070 अशी असून यासह अधिकचे वेतनभत्ते समाविष्ट करण्यात येणार आहेत.

या भरतीमध्ये एकूण 345 जागा भरण्यात येणार असून त्यामध्ये कोकण विभागात 47 पदे, तर पुणे विभागामध्ये 82, नाशिक विभागामध्ये 49 पदे, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 88 पदे, अमरावती विभागामध्ये 35 पदे आणि नागपूर विभागामध्ये 23 पदे ही पुरवठा निरिक्षकांची भरली जाणार आहेत. वरिष्ठ लिपिक म्हणून 21 पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती आयबीपीएसच्या माध्यमातून घेतली जाणार असून यासाठी बहुपर्यायी स्वरुपात 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

विविध पदाच्या भरतीसाठी घेतली जाणारी परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून घेतली जाणार आहे. परिक्षेसाठी 2 तासांचा अवधी देण्यात आला आहे. परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नांना 2 गुण देण्यात येणार असून यामध्ये पास होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण मिळवणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी 12 वी स्तरावरील सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, अंकगणित प्रश्नांचा समावेश असेल. परीक्षेसंदर्भात तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे पात्रता ?

अन्न व पुरवठा विभागातील या भरतीसाठी दोन्ही पदासांठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये पुरवठा निरीक्षक या पदासाठी उमेदवाराने अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी प्राप्त केली असल्यास त्या उमेदवारांना गुणांच्या आधारे प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवाराचे वय दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेले असावे. तसेच उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी 38 वर्षे, तसेच मागासवर्गीय /अनाथ/ प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43 वर्षे, याचसोबत दिव्यांग उमेदवार किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयाची कमाल मर्यादा 45 वर्षे असणार आहे. तसेच या पदभरतीसाठी वयाच्या आणि आरक्षणाच्या बाबतीत अधिकचा तपशील पाहण्यासाठी https:// mahafood. gov. in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आयबीपीएसच्या संकेतस्थळावर आपला अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार पुरवठा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या दोन्ही पदांसाठी वेगवेगळा अर्ज करू शकतात. उमेदवारांनी https:// ibpsonline. ibps. in/ fcscpdjun23/ या संकेतस्थळावर भेट देऊन आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी आपली अचूक माहिती आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी ज्या प्रादेशिक विभागासाठी अर्ज केला आहे. त्यातील परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरात एकूण 22 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2023 आहे.

या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. तर मागासवर्गीय, दिव्यांग/अनाथ यांच्यासाठी 900 रुपये आणि माजी सैनिकांना निशुल्क परीक्षा देता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ऑनलाईन ई-पावतीची प्रत काढून घ्यावी. तसेच ती प्रत तुमच्या ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसोबत प्रिंट काढून तपासणीवेळी सादर करावी. उमेदवारांना परीक्षेच्या 7 दिवस आधी प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहे. उमेदवार तेथून त्याची प्रिंट काढून घेऊ शकतात. . उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार व गुणवत्तेनुसार निवडले जातील. प्रवेशपत्र परीक्षा दिनांकाच्या ७ दिवस अगोदर ऑनलाइन काढून घेता येईल.

या व्यतिरिक्त उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अधिकची तपशीलवार माहिती प्राप्त करून घेण्यासाठी अन्नपुरवठा विभागाच्या https:// mahafood. gov. in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. किंवा https://mahafood.gov.in/website/PDF_files/FCSCPD%20Recruitment%20Group%20C-23.pdf या जाहिरातीच्या दुव्यावर भेट द्यावी लागेल.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT