IAS trigun kulkarni Appointed as State Board Chief Sarkarnama
प्रशासन

Maharashtra State Board : शिक्षण विभागात मोठा बदल; राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच IAS अधिकाऱ्याची अध्यक्षपदी नियुक्ती

First IAS Appointed as State Board Chief : राज्य मंडळाच्या आतापर्यंतच्या इतिहासानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण सेवेतून आलेल्या अधिकाऱ्याची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. त्यानुसार शरद गोसावी यांनी राज्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम केले.

Jagdish Patil

Pune News, 19 Nov : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) अध्यक्षपदी पहिल्यांदाच सनदी अधिकाऱ्याची (IAS) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार त्रिगुण कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

त्रिगुण कुलकर्णी हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये (यशदा) सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राज्य मंडळ ही शिक्षण विभागातील स्वायत्त संस्था आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा राज्य मंडळामार्फत घेतल्या जातात.

राज्य मंडळाच्या आतापर्यंतच्या इतिहासानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण सेवेतून आलेल्या अधिकाऱ्याची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. त्यानुसार शरद गोसावी यांनी राज्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांची बदली प्राथमिक शिक्षण संचालकपदी करण्यात आली.

त्याशिवाय गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला होता. त्यामुळे गोसावी यांनी राज्य मंडळ आणि प्राथमिक शिक्षण विभाग अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली.

मात्र, आता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सनदी अधिकारी अध्यक्षपदी काम करताना दिसणार आहेत.

राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी जवळपास 32 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. तर जुलै-ऑगस्टमध्ये फेर परीक्षा घेतली जाते. राज्य मंडळाने नुकतेच दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेची जबाबदारी आता नव्या अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्याकडे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT