Mumbai News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे हजारो मराठाबांधवांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. मराठा आरक्षणासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईडे निघाला असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी राज्य सरकार अलर्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करणार आहेत. तसेच मराठा समाजातर्फे त्यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे. याबरोबरच दुसरीकडे ओबीसी समाजानेही ठिकठिकाणी मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांच्या साप्ताहिक सुटीसह सर्व प्रकारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाकडून पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पालिका आयुक्तांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीसोबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. तसेच आतापर्यंत नोंदी सापडलेल्यांना तातडीने कुणबी दाखले देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
याबरोबरच कुणबी नोंदी शोधण्याचं कामदेखील युद्धपातळीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे, तर दरम्यान, मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे या आंदोलनासाठी मुंबई पोलिस परवानगी देणार की नाही ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
(Edited By : Ganesh Thombare)
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.