Geeta shejwal  Sarakarnama
प्रशासन

Geeta Shejval : सरकारी रिव्हाॅल्व्हरचा गैरवापर, नगरच्या गीता शेजवळ, संकेत गायकवाड निलंबित

Crime News : पैशांच्या संकलनावरून दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या गोळीबारप्रकरणी नागपूरमध्ये गुन्हा दाखल आहे

Pradeep Pendhare

Nagar News : नगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत असलेले मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना सरकारी रिव्हाल्व्हरचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने निलंबनाचा आदेश काढला आहे.

गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड या दोघांवर नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा १२ जानेवारीला झाला आहे. मोटार वाहन निरीक्षक गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराबाबत वेगळीच माहिती सुरूवातीला समोर आली.

पोलीस तपासात मात्र या गोळीबारामागील खरा प्रकार उघडकीस आला. या गोळीबाराच्या घटनेमागे भरारी पथकाने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. गायकवाड हे पूर्वी शेजवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात कार्यरत होते. यातून हा पैसा संकलित केला जात होता. या पैशावरून दोघांमध्ये वाद होऊन हा गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. गीता शेजवळ यांनी संकेत याच्यावर गोळी झाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी शेजवळवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा तर संकेत गायकवाड यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) संघटन सचिव नूतन रेवतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गीता शेजवळ यांचा भाऊ मुख्यमंत्र्यांसोबतचे छायाचित्र वापरत आरटीओ अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याची तक्रार दिली होती. शेजवळ यांनी तीन आरटीओ अधिकाऱ्यांविरुद्ध नाहक तक्रार दिली असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही कळवले होते. त्याची दखल घेत हे निलंबन आदेश काढल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, बजाजनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रद्द व्हावा, यासाठी गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड हे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. दोघांविरोधात पुढील आदेशापर्यंत आरोपपत्र दाखल करू नका, असे आदेशात म्हटले आहे. तसेच पोलीस दाखल गुन्ह्यात स्वतंत्रपणे तपास करू शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गीता शेजवळ यांची वादग्रस्त कारर्कीद

दरम्यान, गीता शेजवळ यांची कारर्कीद वादग्रस्त असल्याचे समोर येत आहे. शेजवळ या दुसऱ्यांदा निलंबित झाल्या आहेत. धाराशिव येथे २०१६ मध्ये कार्यरत असताना त्यांनी वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणात गडबड केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबित करण्यात आले होते. दोन वर्ष निलंबित कालावधी झाल्यानंतर त्यांना नागपूर ग्रामीण सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी एका खासगी व्यक्तीकडून लाच घेतल्यानंतर त्यांच्यावर आरोप झाला. याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल आहे. यानतंर आता सरकारी रिव्हाल्व्हरचा गैरवापर करून गोळीबार केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

नगर कार्यालयातील 'त्या' वाहनाची चर्चा

नगर प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात दोन दिवसांपूर्वी 'एमएच-१३'चे पासिंग असलेले एक चारचाकी वाहन लावण्यात आले होते. हे वाहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच लावले गेले होते. या वाहनाने अपघात करून नगरमध्ये आले होते. हे वाहन कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नगर कार्यालय परिसरात लावले, याची चर्चा आहे. हे वाहन थेट नगर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पार्किंग झोनमध्ये लावले गेले होते. या वाहनाची चर्चा होऊ लागल्यानंतर तेथून हे वाहन काही अधिकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे वाहन गायब झाले. हे वाहन एका अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाचे असल्याची चर्चा रंगली आहे.

(Edited By: sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT