Sanjay Pande
Sanjay Pande sarkarnama
प्रशासन

Mumbai Police : संजय पांडे यांच्या पहिल्याच निर्णयावर मुंबईकर खूष!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईकरांची वाहने शनिवारपासून पुढील सहा दिवस टोईंग होणार नाहीत. सर्वात आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवत आहोत, अशी घोषणा ट्विटद्वारे करीत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पांडे यांनी नवा निर्णय जाहीर केला असला तरी तो प्रायोगिक तत्त्वावर असून ११ मार्चपर्यंत लागू असेल.

संजय पांडे यांनी पाच दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तांचा पदभार स्वीकारला. त्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक जाहीर करून सर्व मुंबईकरांना तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यांना असंख्य तक्रारी मिळाल्या. त्यातील बहुतांश वाहन टोईंगशी संबंधित होत्या. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सहा दिवसांसाठी वाहन न उचलण्याचा निर्णय पांडे यांनी घेतला आहे. शनिवारपासून पुढील सहा दिवस वाहन टोईंग बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. टोईंग करताना वाहनाचे मोठे नुकसान होते. त्याच्या भरपाईच्या मुद्द्यावरूनही वाहतूक पोलिस आणि वाहनचालकांमध्ये अनेकदा वादावादी होत असल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता.

आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर आयुक्त संजय पांडे यांनी एक पोस्ट टाकली आहे. ‘मुंबईकरांनो, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वात आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवत आहोत. आपण सर्वांनी नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. मिळालेल्या प्रतिसादाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असे पांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टोईंग नको, पार्किंगची व्यवस्था करा!
गेल्या महिन्यात वाहन टोईंग करण्याचा दंड वाढवण्यात आला होता. सध्या टोईंग केल्यास दुचाकीसाठी ७३६ रुपये आणि चारचाकीसाठी ९७२ रुपये दंड आकारला जातो. दंडाची रक्कम वाढवण्यापेक्षा आम्हाला पार्किंगची व्यवस्था करून द्या, अशी बहुतांश वाहनचालकांची मागणी आहे. याआधी दुचाकीसाठी ३६४ रुपये आणि चारचाकीसाठी ७३४ रुपये दंड आकारला जात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT