मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणात वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. यावर आयोगाने मुंबईचे पोलीस (Mumbai Police) आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांना समन्स बजावले आहे.
आपला छळ होत असल्याची तक्रार वानखेडेंनी आयोगाकडे केली होती. यावर आयोगाने पोलीस आयुक्त नगराळे यांना 31 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. नगराळेंना यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले असून, त्यावेळी वानखेडेही हजर राहणार आहेत. या प्रकरणी आयोगाचे संचालक कौशल कुमार यांनी नगराळेंना पत्र पाठवले आहे. आता वानखेडे प्रकरणात मुंबई पोलीसच आरोपी पिंजऱ्यात उभे राहिल्याचे चित्र आहे.
आयोगाचे विजय अध्यक्ष विजय सांपला यांच्यासमोर तुम्ही प्रत्यक्ष 31 जानेवारीला सकाळी 11 वाजता हजर राहावे. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे घेऊन तुम्ही दिल्लीतील आयोगाच्या कार्यालयात यावे, असे कुमार यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले. या प्रकरणाची चौकशी आयोगासमोर प्रलंबित असल्याने महाराष्ट्र सरकारने वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबरला संपला आहे. वानखेडे यांनी कार्यकाळ वाढवण्यासाठी अर्ज केलेला नव्हता. तसेच, मुदतवाढीबाबत मुख्य कार्यालयातूनही त्यांना काहीही सांगण्यात आलेले नाही. वानखेडे यांना ऑगस्टमध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. मागील काही दिवसांत झालेल्या वादामुळे त्यांना मुदतवाढ मिळालेली नाही. अखेर एनसीबीने वानखेडेंना त्यांच्या मूळ सेवेत पाठवण्याचा आदेश काढला.
वानखेडे हे आयआरएसच्या सीमा शुल्क व अप्रत्यक्ष कर शाखेचे अधिकारी आहेत. ते पुन्हा याच शाखेत रुजू होणार आहेत. या शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या महसुली गुप्तचर संचालनालयात वानखेडेंना नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबई एनसीबीमध्ये दाखल होण्याआधी ते याच विभागात होते. आता पुन्हा एकदा त्याच विभागात रूजू होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.