Jallosh Shikshanacha Sarkarnama
प्रशासन

PCMC Education Program : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कार्यक्रम पुणे पालिकेच्या हद्दीत, नेमकं कारण काय?

Roshan More

Pimpri Chinchwad : आपल्या शाळांचे यश साजरे करीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्चून 'जल्लोष शिक्षणाचा' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 23 आणि 24 जानेवारीला हा कार्यक्रम पार पडला. मात्र, हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड महापालिकेचा असताना त्याचे आयोजन पुणे महापालिकेच्या हद्दीत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कार्यक्रम महापालिकेचा असला तरी उदघाटनापासून समारोपापर्यंत राजकीय नेत्यांचीच मांदियाळी या कार्यक्रमात दिसून आली. त्याची देखील चर्चा होत आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या'जल्लोष शिक्षणाचा' कार्यक्रम आयोजित केला होता.पिंपरी महापालिका शाळांतील १४ हजार मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा दावा पालिकेच्या शिक्षण विभागाने केला. समारोपाला चार हजार विद्यार्थी हजर होते,असे देखील सांगण्यात आले. PCMC Education Program

' जल्लोष शिक्षण कार्यक्रमासाठी येवढ्या मोठ्या संख्येने मुले येणार असल्याने तेवढ्या क्षमतेचे इनडोअर स्टेडियम पिंपरी-चिंचवडमध्ये नसल्याने हा कार्यक्रम शहराबाहेर पुणे महापालिका हद्दीत करावा लागला', असे पिंपरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (शिक्षण विभाग) विजय थोरात यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. मुलांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी शहरापासून पीएमपीएमएल बसची मदत घ्यावी लागली. दरम्यान, खासगी शाळांमध्ये असे उपक्रम घेतले जातात. म्हणून तो पालिका शाळेत घेण्यात आला,असे पिंपरी महापालिकेतून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना सर्जनशीलता आणि कल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला आणि हस्तकला आदी विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करता यावे आणि त्यांच्या कल्पना, विचारसरणीला चालना मिळावी हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे, असे पिंपरी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी सांगितले.

जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रमाचे उदघाटन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. त्यावेळी चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप उपस्थित होत्या. तर, या उपक्रमाच्या समारोपाला भाजपच्या विधान परिषदेतील आमदार उमा खापरे,माजी उपमहापौर केशव घोळवे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासगी शाळेतील विद्यार्थीही उपस्थित

विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचे आयोजन या 'जल्लोषात' करण्यात आले होते. त्यात सापशिडी, कोडे, शुटींग, बास्केटबॉल, स्लायडिंग, बॉलिंग, टॅग, ऑब्स्टॅकल कोर्स, बबल्स, बलुन टॉस, रिंग, व्हीआर व्हिडीओ गेम्स, मिनी गोल्फ आदी खेळांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रदर्शित करणारे स्टॉल्स, कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गेम झोन या ठिकाणी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनीही गर्दी केली होती.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT