Maharashtra PSI
Maharashtra PSI sarkarnama
प्रशासन

Maharashtra Police : फूलपॅंटनंतर महत्वाचा ठरणारा निर्णय अखेर सरकारने घेतला...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अनेक जुन्या मराठी चित्रपटांत मुंबईचा पोलिस हा निळ्य़ा हाफपॅंटमध्ये असल्याचे दिसून येते. या हाफपॅंटची फूलपॅंट करण्याचा निर्णय 1980 च्या काळात घेण्यात आला. तेव्हापासून पोलिसांचा लूक बदलला. तो एक महत्वाचा निर्णय मानण्यात आला. आता त्यानंतर पोलिसांच्या करिअरमध्ये बदल घडविणाऱ्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. आता प्रत्येक पोलिस हा निवृत्त होईपर्यंत फौजदार (उपनिरीक्षक) होऊ शकतो, अशी पदरचना करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यासाठीच्या आदेशावर आज स्वाक्षरी झाली. या निर्णयाची अंमलबजाणी करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे.

पोलिसांच्या सध्याच्या पदांत पोलिस शिपाई त्यानंतर पोलिस नाईक, हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक (ASI) आणि त्यानंतर उपनिरीक्षक (PSI) अशी रचना आहे. या साखळीतील पोलिस नाईक हे पद रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस शिपाई हे पहिल्या बढतीनंतर हवालदार, त्यानंतर ASI आणि PSI बनू शकतात.

याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील हजारो पोलीस शिपाई, हवालदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज झाला आहे. यामुळे पोलीस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल.

राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टीकोनातून हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता. या निर्णायाला आज मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. या पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरीता मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल.

या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गातील ३८ हजार १६९ पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे.

यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलिस शिपायांची पदे १ लाख ८ हजार ५८, पोलिस हवालदारांची पदे ५१ हजार २१०, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे १७ हजार ७१, इतकी वाढतील.

पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने पोलीस अधिकाऱ्यांची गरज भागेल तसेच पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या तपासी अंमलदारांच्या सध्याच्या संख्येमध्येही भरीव वाढ होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास गृहमंत्री यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT