Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारांची संख्या वाढत असल्याची तक्रार केली जात असताना पुणे महापालिकेत काम करणाऱ्या 12 इंजिनिअर्सने चक्क राजीनामा दिला आहे. आपले राजीनामे या इंजिनिअर्सने अंतिम मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर एका महिन्याची नोटीस देऊन काम करावे लागते. मात्र, तातडीने पदमुक्त होण्यासाठी या इंजिनिअर्सने एका महिन्याचा पगारदेखील पालिकेला देण्याची तयारी दाखविली आहे.
पुणे महापालिकेत गेल्या वर्षी इंजिनिअर्सची भरती केली होती. काेरोना काळानंतर पुणे (PUNE) महापालिकेत 127 पदांची भरती करण्यात आली होती. त्यासाठी जाहिरात प्रक्रिया राबवून संबंधित उमेदवारांची परीक्षा घेत त्यातून महापालिकेने ही भरती केली होती. अनेक दिव्य पार पाडल्यानंतर पालिकेत काम करण्याची संधी उमेदवारांना मिळाली होती. मात्र, ही भरती झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच 12 इंजिनिअर्सने आपले राजीनामे दिले आहेत.
महापालिकेच्या स्थापत्य विभागात या इंजिनिअरची नियुक्ती करण्यात आली होती. राजीनामा दिलेल्या बहुतांश इंजिनिअर्सनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा दिली होती. त्याचा निकाल गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. त्यामध्ये वरिष्ठ पातळीवरील नियुक्ती मिळत असल्याने इंजिनिअर्सनी पालिकेतील सेवेचे राजीनामे दिले असल्याची चर्चा पालिकेत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महापालिकेच्या सेवेचा राजीनामा देताना या इंजिनिअर्सकडून वेगवेगळी कारणे देण्यात आली आहेत. यामध्ये घरगुती कारणांसह पालिकेतील कामाचा वाढता ताण अशा कारणांचा समावेश आहे. राजीनामा दिलेल्या इंजिनिअर्सपैकी काही जणांना एमपीएससी (MPSC) मार्फत वर्ग २ च्या नियुक्त्या मिळाल्या आहेत. पालिकेचे पद हे वर्ग ३ चे असल्याने पुढील काळात चांगला पगार मिळू शकतो, त्यामुळे हे राजीनामे देण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून दिले जात आहेत.
पुणे महापालिकेतून (PMC) गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झालेले आहेत. तर अनेकांना पदोन्नती मिळालेली आहे. त्यामुळे ज्युनिअर इंजिनिअर्स पदावर काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी उपलब्ध नव्हते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने 127 पदांची भरती केली होती. पालिकेच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी या इंजिनिअर्सने राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिल्या होत्या. त्याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये मोठे पद मिळत असल्याचे समोर आल्याने पालिकेच्या सेवेला राम राम करण्याचा निर्णय घेत या इंजिनिअर्सने आपले राजीनामे पालिकेकडे सादर केले आहेत.
पालिकेतील 12 इंजिनिअर्सचे राजीनामे प्रशासकडे आले असून, त्यातील 10 राजीनामे मंजूर केले आहेत. राजीनामा दिल्यानंतर एका महिन्याची मुदत असते, मात्र काही उमेदवारांनी एका महिन्याचे वेतन भरण्याची तयारी दाखविल्याने त्यांचे राजीनामे तातडीने मंजूर करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या प्रभारी उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.