पिंपरी : रजनीश शेठ (Rajnish Sheth) यांची राज्य सरकारने शुक्रवारी (ता.१८ फेब्रुवारी) राज्याचे पोलिस महासंचालक तथा डीजीपी (DGP) म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे गेले दहा महिने प्रभारी डीजीपी असलेल्या संजय पांडे (Sanjay Pandey) यांना या पदावरून जावे लागले. केंद्रीय लोकसेवा आय़ोगाची (UPSC) शिफारस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निकालामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. राज्य सरकारच्या गृह विभागाने आज (ता.18 फेब्रुवारी) काढलेल्या यासंदर्भातील आदेशाने त्याला दुजोरा मिळाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शिफारशीमुळे शेठ यांची नियुक्ती केल्याचे त्यात स्पष्ट म्हटले आहे. मात्र,ती करताना त्यांच्यापेक्षा एक वर्षाने ज्येष्ठ (सिनीअर) असलेले हेमंत नगराळे या मराठी आयपीएस अधिकाऱ्याला,मात्र डावलण्यात आले आहे.त्यांच्याप्रमाणे कुणी राजकीय गॉडफादर नसल्याने डॉ. के. वेंकटेशम यांचीही या पदी वर्णी लागू शकली नाही.
दरम्यान, प्रभारी असूनही अवघ्या दहा महिन्यात कायम डीजीपींपेक्षा अतिशय प्रभावी काम करीत आपल्या कामाचा ठसा पांडे यांनी सोडला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचे अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न त्यांनी त्याचा राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करीत मार्गी लावले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या मनात पांडे यांची प्रतिमा ही देवमाणूस म्हणून तयार झाली होती. मात्र,ते गेल्याने राज्य सरकारकडे प्रलंबित राहिलेल्या पोलिस कल्याणाच्या आणखी काही प्रलंबित मागण्यांना करकचून ब्रेक लागला आहे.
राज्य सरकारने १९८८ च्या आय़पीएस बॅचचे राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक रजनीश शेठ यांची राज्याचे डीजीपी म्हणून नियुक्ती केली. ती करताना, त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेले १९८७ च्या आयपीएस बॅचचे मुंबईचे पोलिस आय़ुक्त हेमंत नगराळे यांना डावलण्यात आले आहे. त्यांनाच नव्हे,तर त्यांच्याप्रमाणेच कुणी राजकीय गॉडफादर नसल्याने डीजीपी पदाच्या शर्यतीत असलेले १९८८ च्याच बॅचचे डॉ. के. वेंकटेशम यांचीही या पदावर वर्णी लागू शकली नाही. ते डीजीपी झाले असते,तर पुणे पोलिस आयुक्त म्हणून काम केलेला अधिकारी राज्याच्या सर्वोच्च पोलिस पदावर गेलेला पहायला मिळाला असता.पांडे यांच्याप्रमाणे त्यांच्याअगोदर नगराळे हे ही प्रभारी डीजीपी होते. पण, अॅन्टिलिया प्रकरणात मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांची गेल्यावर्षी बदली डीजी (होमगार्ड) म्हणून बदली झाली अन त्यांच्याजागी नगराळे यांची लॉटरी लागली होती.तर, नगराळे हे प्रभारी डीजीपीपदावरून मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून आल्याने त्यांच्याजागी गेल्यावर्षी ९ एप्रिलला पांडे यांच्याकडे डीजीपीपदाचा अतरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. आता तो पुन्हा काढून घेतल्याने त्यांना पुन्हा व्यवस्थापकीय संचालक (सुरक्षा महामंडळ) या मूळ जागी जावे लागणार आहे. मात्र,प्रभारी म्हणून अवघ्या दहा महिन्यात केलेले काम राज्य पोलिस दल व त्यातही कर्मचारी हे कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या भल्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. गेल्या कित्येक वर्षापासूनचे त्यांच्या कल्याणाच्या प्रलंबित अनेक योजना त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मार्गी लावल्या. महिला पोलिसांची आठ तासांची ड्यूटी केली. पोलिस कर्मचारी म्हणून भरती झालेला त्यांच्यामुळेच आता पीएसआय म्हणजे अधिकारी म्हणून आता सेवानिवृत्त होणार आहे.म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांत त्यांची देवमाणूस अशी प्रतिमा तयार झालेली होती. मुंबईतील लोकलने प्रवास करणारे पांडे हे पहिलेच अतिवरिष्ठ आय़पीएस अधिकारी आहेत. प्रभारी पोलिस महासंचालकांच्या पदावर येईपर्यंत ते लोकलने घर ते कार्यालय ये जा करीत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.