Thackeray-Shinde Dasara Melava : Sarkarnama
प्रशासन

Dasara Melava 2023 : मुंबई पोलिस अलर्ट; ठाकरे-शिंदेंच्या मेळाव्याला १५ हजार पोलिसांचा पहारा

अनुराधा धावडे

Mumbai Political News : शिवसेनेतील बंडाने ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसागणिक उसळत असतानाच, या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यानेही पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. आपापल्या मेळाव्यांना विक्रमी गर्दी करून आपलीच शिवसेना ताकदवान असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न ठाकरे - शिंदे करीत आहेत.

एकाच दिवशी, तेही मुंबईतही लाखो शिवसैनिक एकत्र येणार असल्याने मुंबई पोलिसांचा यंदाही ताप वाढला आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून मुंबईत तब्बल १५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवतीर्थ आणि आझाद मैदानावर पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मेळावे शांततेत व्हावेत, याकरिता पोलिसांची यंत्रणा उभारली आहे. शिवसेनेसाठी अर्थात, ठाकरे आणि शिंदेंच्या संघटेनासाठी दसरा मेळाव्याला महत्त्व आहे. त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांना मेळाव्याला बोलावून ठाकरेंसाठी निष्ठा दाखविण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.

तर, खरी शिवसेना आपल्याच बाजूने आहे, हे गर्दीच्या आकड्यांवरून दाखविण्याची शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी चंग बांधला आहे. या दोन्ही मेळाव्यांसाठी राज्यभरातून एक-दीड लाख शिवसैनिक मुंबईत येण्याची चिन्हे आहेत. काही भागांत एकाच वेळी दोन्ही गटाचे शिवसैनिक आमने-सामने येण्याची भीती असते. त्यामुळे गोंधळ उडण्याचीही शक्यता असल्याचे पोलिसांनी काळजी घेतली आहे.

शिवतीर्थावर होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्यासह आझाद मैदानावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवला. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणीही पोलिसांची नेमणूक केली आहे. त्यानुसार मुंबईत सुमारे १५ हजार पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा पहारा असेल. त्यात, १२ हजार ४४९ पोलिस शिपाई, अडीच हजार पोलिस निरीक्षक, ४५ सहायक पोलिस आयुक्त, १६ उपायुक्त आणि ६ अपर पोलिस आयुक्तांचा समावेश आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर कधी नव्हे अशी तिची दोन शकले पडली. गेल्या दीड वर्षापासून ठाकरे आणि शिंदे गटातून विस्तवही जात नाही. गेल्या वर्षी पहिल्यांदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. दोन्ही गटांनी आपापल्या दसरा मेळाव्याला गर्दी व्हावी, यासाठी जिवाचे रान केले होते. या वर्षीही वेगळी परिस्थिती नाही. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, वेगाने घडणाऱ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT