UPSC, NDA
UPSC, NDA File Photo
प्रशासन

महिलांसाठी खूषखबर; UPSC नं इतिहासात पहिल्यांदाच उचललं मोठं पाऊल

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) शुक्रवारी इतिहासात पहिल्यांदाच मोठं पाऊल उचललं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी आयोगानं प्रवेश परीक्षेची केवळ महिलांसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिध्द केली आहे. केवळ महिलांसाठी जाहिरात काढण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

एनडीएच्या परीक्षेत महिलांनांही संधी मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत एनडीएमध्ये महिलांना भरती होण्यास परवानगी दिली आहे. पण पुढील शैक्षणिक वर्षापासून महिलांना यामध्ये सहभागी होता येईल, असं सरकारनं न्यालायात सांगितलं होतं. पण न्यायालयानं त्यावर आक्षेप घेत महिलांना लगेचच ही परवानगी देण्याचे आदेश दिले.

न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार, युपीएससीनं शुक्रवारी लगेचच याबाबतची जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यानुसार अविवाहित महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल प्रबोधिनी (NA) मध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेत सहभागी होता येणार आहे. शुक्रवारपासून युपीएससीच्या संकेतस्थळावरून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी आठ ऑक्टोबर ही अखेरची मुदत आहे.

दरम्यान, कुश कालरा यांच्याद्वारे दाखल या याचिकेत एनडीएमध्ये योग्य आणि इच्छुक महिला उमेदवारांना सामावून घेतलं जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याचिकेत म्हटलं आहे की, महिलांना केवळ जेंडरच्या आधारावर एनडीएमध्ये समाविष्ट केलं जात नाही. ही बाब समानतेच्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. याचिकेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती की, योग्य महिला उमेदवारांना एनडीएत संधी न देणं घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही. कारण ही संधी केवळ त्या महिला असल्यामुळं नाकारली जात आहे.

एनडीए प्रवेश परीक्षेसाठी महत्वाचे -

- केवळ अविवाहित महिलांनांच अर्ज करता येणार

- जन्म 2 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 या कालावधीतील हवा

- शिक्षण किमान बारावी उत्तीर्ण हवे

- अर्ज करण्यासाठी 8 ऑक्टोबरपर्यंत मुदत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT