Grampnchayt  Sarkarnama
प्रशासन

Waluj Gram Panchayat News : टॉवरला अनधिकृत परवानगी भोवली; वाळूज ग्रामपंचायत बरखास्त..

Political News : टॉवर उभारणीसाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली. ही परवानगी देताना कुठलेही नियम पाळले गेले नाहीत. त्यासाठी कुठलाही करार केला गेला नाही. ग्रामपंचायतीने ही परवानगी देताना ठरावही घेतला नाही.

Jagdish Pansare

Chhatrpati SambhajiNagar News : शहरालगत असलेल्या वाळूज ग्रामपंचायतीने नियमबाह्यरीत्या एका कंपनीला टॉवर उभारण्याची परवानगी दिली. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व 17 ग्रामपंचायत सदस्यांना पदांवरून पायउतार करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाने दिला. या प्रकरणात तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले.

येथील रामराई रस्त्यावर शिवशक्ती ही कामगार वसाहत आहे. या वसाहती लागत शिवराई आश्रम शाळा आहे. या परिसरात अहमदाबाद येथील जियो डिजिटल फायबर लिमिटेड कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली. ही परवानगी देताना कुठलेही नियम पाळले गेले नाहीत. त्यासाठी कुठलाही करार केला गेला नाही. ग्रामपंचायतीने ही परवानगी देताना ठरावही घेतला नाही. ग्रामपंचायत (Waluj Grampnchayat) दप्तरी कोणतीही नोंद घेतली नाही.

परवानगी देताना शासनाचा महसूल बुडवून तसेच लगतच्या रहिवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. हे टॉवर शाळेपासून किमान 100 मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामपंचायतीने अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने ही परवानगी दिल्याचे निदर्शनास आणून देत जागरूक नागरिक भास्कर चव्हाण यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती.

यावर जिल्हा परिषदेच्या (Jilha Parishad) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 12 डिसेंबर 2022 ला महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशावरून 26 फेब्रुवारी 2024 ला अहवाल सादर करण्यात आला. त्यात संबंधित तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एन. के. मतसागर यांनी संचिका अद्ययावत न ठेवल्याचे नमूद केले. त्या आधारे आता विभागीय कार्यालयाने सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध बरखास्तीची कारवाई केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात सरपंच सईदा पठाण यांच्या स्वाक्षरीने 3 मार्च 2022 ला ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीची सूचना काढण्यात आली. मात्र, या बैठकीस सरपंच पठाण गैरहजर होत्या. त्यामुळे ही बैठक उपसरपंच योगेश आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात ठराव क्रमांक दहा घेण्यात आला असून, मोबाइल टॉवर उभारणीस नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे यांनी सुचविले. त्यांना अमिनाबी पठाण यांनी अनुमोदन दिले.

या बैठकीत पोपट बनकर, आशाबी अजीम शेख, राहुल भालेराव, मंजूषा जैस्वाल, नम्रता साबळे, तौफिक शेख, शमीम शेख जमील, रंजना भोंड, विमल चापे, कल्पना तुपे, युसूफ कुरेशी, समिना बेगम अमजत खा आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या ठरावात टॉवर उभारणीस नाहरकत प्रमाणपत्र व ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्यास चार्जेससह परवानगी दिल्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

यानुसार संबंधित कंपनीने 30 जून 2022 रोजी तीन लाख दहा हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीकडे जमा केला. दरम्यान, 17 ग्रामपंचायत सदस्यांना विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी अपात्र ठरविले. शिवाय तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एन. के. मतसागर हे तत्कालीन सचिव असल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्याविरुद्ध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT