IPS Mahesh Bhagwat
IPS Mahesh Bhagwat Sarkarnama
पुणे

महेश भागवत टीमचे मार्गदर्शन घेतलेले १०० जण 'युपीएससी'त यशस्वी..

महेश जगताप

पुणे : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश एम. भागवत आणि त्यांच्या टीमनं मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या टीमकडून मार्गदर्शन घेतलेले एक, दोन नव्हे तब्बल १०० विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) नुकत्याच लागलेल्या निकालात पास झाले आहेत.

महेश भागवत हे सध्या हैदराबादमधील रचकोंडाचे पोलिस आयुक्त आहेत. महेश भागवत आणि त्यांच्या टीमने मुलाखतीसाठी मार्गदर्शन केलेल्या एकूण १०० उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. उत्तीर्ण झालेल्या टॉप १०० रँकर्समध्ये महाराष्ट्रातील १३ व्या क्रमांकावर असलेल्या प्रियंवदा म्हाडदळकरसह १६ उमेदवारांना रचकोंडा पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी प्रशिक्षण दिले होते.

त्याचप्रमाणे, १०१ ते ६८५ मधील रँक असलेल्या ८३ हून अधिक उमेदवारांना भागवत आणि त्यांच्या टीमने मुलाखतीसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय, पंजाब, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांनी या निकालात यश मिळवलं आहे.

दरवर्षी मुख्य परीक्षेनंतर महेश भागवत हे त्यांच्या मार्गदर्शकांच्या टीमसह IAS, IPS आणि IRS अधिकारी आणि विषय तज्ञ व्यक्तिमत्व चाचणीसाठी विनामूल्य प्रशिक्षण देतात. हे प्रशिक्षण विशेषत: नागरी सेवा इच्छूकांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिले जाते. केवळ दोन तेलगू भाषिक राज्यांतीलच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, आसाम, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारही त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये असतात.

भागवत यांच्यासह या मार्गदर्शक टीममध्ये डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नितीश पाथोडे, आनंद पाटील, सुप्रिया देवस्थळी, नीळकंठ आव्हाड, समीर उन्हाळे, राजीव रानडे, विवेक कुलकर्णी, अभिषेक सराफ, मुकुल पाटील, सतविन कुलकर्णी, सतीश पाटील, डॉ. इंगवले, अनुदीप दुरीशेट्टी, साधू नरसिंहा रेड्डी, पी श्रीजा, नीलकंठ आव्हाड आदींचा समावेश आहे.

मी अभ्यास करीत असताना मला अनेक अडचणी आल्या त्या फक्त इतरांच्या वाटेला येऊ नये यासाठीच धडपड .हे काम मी एकटा करीत नाही यासाठी माझे सहकारी खूप मेहनत घेतात.

- महेश भागवत (रचकोंडा पोलीस आयुक्त )

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालांमध्ये पहिल्या शंभर मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठी आमची टीम व्हाट्सअप च्या माध्यमातून कार्यरत आहे.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर,(संचालक आंतरराष्ट्रीय संबंध मुंबई विद्यापीठ)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT