Krishna Prakash Sarkarnama
पुणे

तिघांचे प्राण वाचवणाऱ्या १३ वर्षीय आयुषचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले कौतुक

कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांच्याकडून चांगल्या कामाची दखल.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : तलावात बुडणाऱ्या आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या तीन मुलांना एका १३ वर्षीय शूर बालवीराने मंगळवारी (ता.२८ सप्टेंबर) दुपारी वाचवले. पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत ही घटना घडली. या बालवीराच्या धाडसाची लगेच दखल घेत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्याचा सत्कार करून त्याला बक्षीस, प्रमाणपत्र व भेटवस्तू दिल्या.

आयुष गणेश तापकीर (वय १३, रा.तापकीर चाळ, गुळवेवस्ती, भोसरी) असे या धाडसी मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिकत आहे. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे तो दुपारी दिघी मॅग्जीनजवळील सदगुरुनगर येथील रानात आपल्या म्हशी चारायला गेला होता. तेथील तलावात त्याला एक मुलगा बुडताना दिसला. त्यावेळी तेथे इतर मोठी माणसे होती. पण, त्यांनी या मुलाला वाचवायचे धाडस केले नाही. मात्र, आयुषने आपल्या जीवाचा विचार न करता पाण्यात उडी मारली. बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढले. तेव्हा आणखी दोन मुले बुडत असल्याचे त्याला दिसले. त्याने त्यांनाही बाहेर काढले. ते तिघेही नाकातोंडात पाणी गेल्याने बेशुद्ध पडले होते.

प्रसंगावधान राखत आयुषने त्यांची पोट दाबून पाणी बाहेर काढले. दरम्यान, आणखी एक मुलगा पाण्यात उतरल्याचे त्याला समजताच त्याने त्याचाही शोध घेतला. पण, तो सापडला नाही. म्हणून त्याने पोलिसांना फोन केला. याची माहिती मिळताच काही मिनिटातच भोसरी पोलिस ठाण्यावरील उपनिरीक्षक काळे, पोलिस नाईक पारधी, पोलिस शिपाई तरडे घटनास्थळी आले. त्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. त्यांनी चौथ्या मुलाचा (सूरज अजय वर्मा, वय १२) मृतदेह बाहेर काढला.

आयुषने नवे आयुष्य दिलेल्या संदीप बावना डवरी (वय १२) हा मुलगा पोटातील पाणी बाहेर आल्याने शुद्धीवर आला. त्यामुळे बाकीचे दोघे ओंकार प्रकाश शेवाळे (वय १३) आणि त्याचा भाऊ ऋतुराज (वय १४) यांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही चारही मुले भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील आहेत. लहान वयात मोठी कामगिरी केल्याने आयुषच्या धाडसाचा अभिमान वाटत असल्याचे त्याची आई शीतल यांनी सांगितले. तेथे उपस्थित मोठ्या व्यक्तीने जे केलं नाही, ते आयुषने केले. असे कुठे आपल्या आजुबाजूला घडत असेल, तर, तेथे मोठ्या व्यक्तींनी मदत केली पाहिजे. असे त्या म्हणाल्या. तीन मुलांचा जीव वाचविणाऱ्या आयुषचा मोठा अभिमान वाटतो, असे त्याची आजी ताराबाई यांनीही सांगितले. उपचारादरम्यान ओंकारचा मृत्यू झाल्याचे भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT