Devendra Fadanvis Sarkarnama
पुणे

Devendra Fadanvis: फडणवीसांच्या 'गुडबुक'मधील 'या' अधिकाऱ्याला क्लीन चिट; महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग मोकळा !

उत्तम कुटे

Pimpri- Chinchwad Political News : पुण्याच्या पोलिस आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि सध्या केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकातील महाराष्ट्र केडरच्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना त्यांच्याविरुद्धचे दोन गुन्हे रद्द करीत त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज क्लीन चिट दिली. त्यामुळे महाराष्ट्रात परतण्याचा त्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. योगायोगाची बाब फडणवीस यांनाही नागपूर सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या एका निवडणूक दाव्यातून आजच दोषमुक्त केले.

फडणवीस मुख्यमंत्री असताना शुक्ला या फोन टॅपिंगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप झाल्याने त्यावेळी राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यावरून तत्कालीन एसआयडी प्रमुख शुक्लांविरुद्ध महाविकास आघाडीच्या काळात पुणे, मुंबईत दोन एफआयआर दाखल झाले होते. दरम्यान, त्यामुळे व आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळून त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती घेतली होती.

दरम्यान, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार गेल्या वर्षी सत्तेत आले. फडणवीस गृहमंत्री झाले. त्यातून शुक्ला महाराष्ट्रात परतण्याची चर्चा सुरू झाली. पण, त्यांच्याविरुद्धचे दाखल दोन गुन्हे हा त्यात मोठा अडथळा होता. त्यामुळे ते रद्द व्हावेत म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ती आज मान्य झाली. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रात पुन्हा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या पदावर त्यांची नेमणूक करण्याचा फडणवीसांचा बेत असल्याचे समजते. सध्या त्या डीजीपी दर्जाच्या पदावर आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती राज्याचे डीजीपी वा त्या लेवलच्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर होईल, असा होरा आहे.

दुसरीकडे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात माहिती दडवल्याच्या आऱोपातून फडणवीसांचीही नेमकी आजच नागपूर न्यायालयाने सुटका केली हे विशेष. यामुळे फडणवीस आणि शुक्ला यांना योगाय़ोगाने एकाच दिवशी मोठा दिलासा मिळाला. त्यातून आगामी निवडणूक लढविण्याचा फडणवीसांचा, तर महाराष्ट्रात परतण्याचा शुक्लांचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, नागपूर न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येऊ शकते. ती शक्यता शुक्लांच्या बाबतीत धूसर आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT