PCMC Band  Sarkarnama
पुणे

Maratha Reservation News : जालन्याच्या लाठीमाराचे पिंपरी-चिंचवडमध्येही पडसाद; सर्वपक्षीयांकडून कडकडीत बंद

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri Chinchad News : अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी नुकत्याच केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याविरोधात महायुती वगळून महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष आणि संघटनांकडून जोरदार निदर्शने सुरू असून, बंदही पाळण्यात आला. आज (ता. ९) पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पाळण्यात आला. त्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

जालना मराठा आंदोलनातील बांधवांना झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय, तसेच सर्व स्थानिक संघटनांनी आज पिंपरी-चिंचवड बंदची हाक दिली होती. पिंपरी-चिंचवडकरांनीही या बंदला प्रतिसाद देत सायंकाळपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.

याच वेळी सर्वपक्षीयांनी आणि संघटनांनी पिंपरी कॅम्प येथील भाटनगरपासून मोर्चा काढत 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजीही केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा मोर्चा पोहोचला, तर दुसरीकडे निगडीतून निघालेला मोर्चाही आंबेडकर चौकात पोहोचला. या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भूमिका मांडल्या. इतकेच नव्हे, तर येत्या काही दिवसांत आरक्षणावर तोडगा न काढल्यास येणाऱ्या काळात संवैधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

दरम्यान, आजच्या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने आणि आस्थापना बंद ठेवल्या होत्या. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी बारामती येथून राजेंद्र पाटील यांनी, तर थेट सायकलवरून पिंपरी गाठला होती. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ते सायकलवरूनच जालन्याला जाणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा छावा युवा संघटना, काँग्रेस पक्ष, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वराज्य संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, मराठा महासंघ, श्री जगद्गुरू प्रतिष्ठान, अखिल भारतीय छावा, अखिल भारतीय मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य अभियान, राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरी संघ, अपणा वतन संघटना, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, छावा युवा मराठा महासंघ, आम आदमी पार्टी, एमआयएम, भीमशाही युवा संघटना, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, मराठा जोडो अभियान, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय इसाई महासंघ, दलित पँथर सेना, बौद्ध जनसंघ, शिवशाही संघटना, शिवप्रेमी जनजागरण समिती, मराठा महासभा आदी समाज, कामगार, व्यापारी संघटना व मंडळे बंदमध्ये सामील झाली आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT