Market Yard
Market Yard Sarkarnama
पुणे

Haveli Market Committee : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका मताचा ‘भाव’ फुटला; भाव ऐकूण बसेल धक्का!

सरकारनामा ब्युरो

Pune NCP News : आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २७ मार्चपासून लागणार आहे. ही निवडणूक तब्बल दोन दशकानंतर होत आहे.

या बाजार समितीतीसाठी १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातून इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. परिणामी या निवडणुकीत मतांचा 'भाव' मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत उत्साह दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील कृषी सोसायटी व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीच्याच गटांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) निवडणुकीसाठी ज्येष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्तेही इच्छुक आहेत. त्यांनी प्रारुप यादीनुसार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. पक्षात चुरस वाढल्याने अधिकृत पॅनेलपेक्षा बंडखोरीला वरिष्ठांची फूस असल्याचेही काही इच्छुकांकडून मतदारांमध्ये बिंबवले जात असल्याची माहिती आहे. या सर्व धामधुमीत मताचा भाव ५० हजारांपर्यंत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बाजार समितीचा कारभार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार चालतो. नियमानुसार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यातील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचे सचिव अशा संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार चालवितात.

बाजार समितीच्या सध्याच्या निवडणूक पद्धतीत कार्यक्षेत्रातील सेवा संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्यांकडून ११ व ग्रामपंचायत सदस्यांकडून ४ असे १५ शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात. शिवाय व्यापारी २ व हमाल, मापाडी १ असे एकूण १८ प्रतिनिधी निवडून दिले जातात. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांमध्ये सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १ तर भटक्या जातीजमाती १ अशी विभागणी केलेली आहे.

असा असेल बाजार समिती निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर : २७ मार्च

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : २७ मार्च ते ३ एप्रिल

उमेदवारी अर्जांची छाननी : ५ एप्रिल

वैध उमेदवारी अर्जांची यादी : ६ एप्रिल

अर्ज माघारीची मुदत : ६ ते २० एप्रिल

अंतिम यादी आणि चिन्हवाटप : २१ एप्रिल

मतदान : २९ एप्रिल

मतमोजणी व निकाल : ३० एप्रिल.

१८ वर्षे का रखडली निवडणूक ?

हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक तब्बल १८ वर्षांनी होत आहे. निवडणूक रखडण्यामागे या बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळामध्ये एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, न्यायालयामध्ये वाद, राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे, यातून हवेली बाजार समितीचे संचालक बोर्ड बरखास्त करण्यात आले.

ही संस्था हवेली तालुक्यापुरतीच ठेवायची का? पुणे जिल्ह्यात पुरती मर्यादित ठेवायची? त्याला राज्यस्तरीय दर्जा द्यायचा का? राज्यस्तरावर निवडणूक घ्यायची तसेच अनेक लोक यासंदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते अजूनही आहेत. शेवटी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, बाजार समितीची निवडणूक ही, २९ एप्रिल २०२३ रोजी घेणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक होतआहे.

किती मतदार ?

आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती साठी १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी सोसायटी मधून ११ जागांसाठी एक हजार ६५५ मतदार, ग्रामपंचायतमधून चार जागांसाठी ७१३ मतदार, व्यापारीमधून दोन जागांसाठी १३ हजार १७० मतदार तर कामगार हमाल मापाडीमधून एका जागेसाठी एक हजार ७८० मतदार असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT