Uddhav Thackeray, Manisha Kayande Sarkarnama
पुणे

Shivsena (UBT) News : 'या' कायद्यानुसार मनीषा कायंदेंवर होऊ शकते कारवाई; अनंत कळसेंची माहिती

सरकारनामा ब्यूरो

Anti Defection Law : शिवसेनेच्या (ठाकरे गट) विधानपरिषदेतील सदस्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाने तत्पुरीच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली. दरम्यान, कायंदे यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाची आता चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. कायंदे यांच्या पक्षांतरामुळे विधानपरिषदेतील ठाकरे गटाकडे असणारे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे हे कायंदे यांच्यावर काय कारवाई करणार याबाबत चर्चा होऊ लागली आहे. (Latest Marathi News)

याबाबत 'सरकारनामा'शी बोलतना विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते यावर पुढील बाबी अवलंबून असल्याचे सांगितले.

कळसे म्हणाले, "कायंदे यांच्या पक्षांतराने विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील संख्याबळ सारखेच ९ झाले आहे. आता महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी याबाबत काय निर्णय घेतील, यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे आता तरी काय होईल हे सांगता येत नाही."

ठाकरे गटाला कायंदे यांच्या आमदारकीबाबत कारवाई करता येईल का, यावर कळसे म्हणाले "मनीषा कायंदे या शिवसेनेतील विधानसभेतील आमदाराच्या कोट्यातून विधानपरिषदेवर निवडल्या गेल्या आहेत. आता त्यांनी पक्षांतर केले असले तरी हा कोटा वर्ग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ठाकरे गटाकडून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता दिली आहे. मात्र या पक्षाच्या १६ आमदारांच्या बडतर्फीचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष देणार आहेत. मूळ पक्ष कुठला, याचाही निकाल येणार आहे. त्यामुळे सध्या आहे तशीच स्थिती राहील."

पक्षांतर बंदी कायद्यानुसार मात्र कायंदे यांच्यावर कारवाईची शक्यता कळसे यांनी वर्तवली आहे. ते म्हणाले, "सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आहेत. त्यांच्याकडे ठाकरे गटातील कुणी तरी पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत याचिका दाखल करणे गरजेचे आहे. त्यानंतर कायंदे यांच्यावर कारवाई होण्याची होऊ शकते. उपसभापती गोऱ्हे कायद्यानुसार काय ती कारवाई करतील."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT