Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरानंतर पुणे एसीबीने आपला मोर्चा आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे वळवला आहे. गेल्या काही दिवसांत तेथील लाचखोरांना ते पकडत आहेत. बुधवारी त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा (ता. मावळ) अकाउंटंट नरेंद्र अनंतराव कणसे (वय 55) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
तळेगाव नगरपरिषदेतील ही खाबूगिरी नगरपरिषदेच्याच एका तरुण ठेकेदारामुळे (वय ३८) उजेडात आली. त्यांना कोरोना काळात तळेगावात सॅनिटायझर फवारणीचे कंत्राट मिळाले होते. तसेच स्मशानभूमीत गॅस शवदाहिनीचा ठेकाही मिळाला आहे. त्यातील सॅनिटायझर फवारणीचे बिल मंजूर करण्यासाठी कणसेने बिलाच्या एक टक्के रकमेची मागणी लाच म्हणून या ठेकेदाराकडे केली होती. त्यावेळी त्यांनी ती दिली नाही.
दरम्यान, त्यांचे गॅस शवदाहिनीचे काम झाले. त्याचे बिल निघाले. ते तसेच मागील सॅनिटायझरचे बिल काढण्यासाठी एक टक्का लाच कणसेने मागितली. ती घेताना एसीबीचे पीआय प्रसाद लोणारे आणि पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर, सुनील सुराडकर, आशिष डावखर, दीपक दिवेकर या पथकाने त्यांना आज रंगेहाथ पकडले. त्यानंतर कणसेविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्य़ात आला.
याच महिन्यात १३ तारखेला पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) नगरपरिषदेतील लाचखोरी तेथील एका २९ वर्षीय तरुण ठेकेदारामुळे उघडकीस आली होती. त्या प्रकरणातही त्या नगरपरिषदेतील अकाउंटंट आऱोपी आहे, हा योगायोग आहे.
सदर तरुण ठेकेदाराने नगरपरिषदेला पुरविलेल्या आरोग्य साहित्याचे बिल मंजूर करण्यासाठी त्याच्या दहा टक्के लाच मागण्यात आली होती. ती नगरपरिषदेच्या कार्यालयातच घेण्याचे धाडस नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या इंजिनिअर चारुबला राजेंद्र हरडे (वय ३१) यांनी केले होते.
ही लाच घेण्यास त्यांना प्रवृत्त केल्याबद्दल त्या गुन्ह्यात तेथील नगरपरिषदेचा अकाउंटंट प्रवीण गणपत कापसे (वय ३५) आणि सीईओ श्रीकांत अण्णासाहेब लाळगे (वय ३५) यांनाही आऱोपी करण्यात आले. त्यात कापसे पकडला गेला, तर लाळगे हा फरार झाला होता.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.