Rahul kul
Rahul kul  Sarkarnama
पुणे

Daund Market Committee : सर्वांचे समाधान होणार नाही; पण पक्षादेश मानून कामाला लागा : राहुल कुलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सरकारनामा ब्यूरो

यवत (जि. पुणे) ''दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. ही निवडणूक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार हातात हात घालून ताकदीने लढतील. विजयासाठी वेळ दिला पाहिजे. सर्वानुमते उमेदवार दिला जाईल. मात्र सर्वांचे समाधान होईल असेही होणार नाही. पक्षाचा आदेश मानून काम केले पाहिजे.'' असे मत आमदार राहुल कुल (Rahul kul) यांनी आज चौफुला (ता. दौंड) येथील भाजपच्या मेळाव्यात व्यक्त केले. (Activists should start working for Daund Bazar Samiti Election : Rahul kul )

बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप व मित्र पक्षांचा मेळावा आज घेण्यात आला. त्यावेळी कुल बोलत होते. या वेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, नीलकंठ शितोळे, आनंद थोरात, शिव संग्रामचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आमदार कुल म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात आपल्याला चांगले यश मिळाले आहे. सोसायटी मतदार संघात आपली परिस्थिती सुधारली आहे. आता गाफिल न राहता आपण सर्वांनी खांद्याला खांदा देऊन लढले पाहिजे. शेतक-यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने दौंड बाजार समिती नावारूपाला आणू.

प्रेमसुख कटारिया म्हणाले, ''दौंड बाजार समितीकडून शेतक-यांच्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत. निवडणुकीत हार जीत पेक्षा टक्कर देणे महत्वाचे आहे. विकासकामांवरील लक्ष विचलित करण्यासाठी भीमा पाटसचा मुद्दा उपस्थित केला जातो हे दुर्देवी आहे.''

वासुदेव काळे म्हणाले, ''केंद्रात व राज्यात भाजपचे सरकारचे आहे. या संधीचा फायदा घेत बाजार समितीचा विकास साधायचा असेल तर दौंड बाजार समितीत सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार मोडीत काढला आहे. राष्ट्रवादीला हरविण्यासाठी नव्हे तर शेतक-यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या निवडणुकीत ताकदीने लढले पाहिजे.''

सरकारच्या अभिनंदनाचा ठराव

शिंदे-फडणवीस सरकारने बाजार समितीत सर्वसामान्य शेतक-यांना मतदानाचा अधिकार दिल्याबद्दल भाजपचे वासुदेव काळे यांनी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मेळाव्यात मांडला. त्यास टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT