Shirur News : Shivajirao Adhalrao Patil :  Sarakarnnama
पुणे

Adhalrao Patil News : शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आढळराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले...

Loksabha Election 2024 : ...त्यामुळे त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली की काय? अशी चर्चा रंगली आहे.

Chaitanya Machale

Shirur Lok Sabha Constituency News : बारामती बरोबरच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात दररोज नवीन नवीन घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तर या मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. खासदार आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्या गटात जाणे पसंत केले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करतात. आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या गटबाजीनंतर खासदार कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ न देता ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) यांच्याबरोबर राहणे पसंत केले आहे.

त्यामुळे नाराज झालेल्या अजित पवार यांनी खासदार कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. यापूर्वी झालेल्या जाहीर कार्यक्रमात देखील अजितदादांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूरच्या खासदाराला पाडणार म्हणजे पाडणारच! असे जाहीर आव्हान दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरूर लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा अजित पवार(Ajit Pawar) यांनी केली असली तरी त्यांना अद्यापही उमेदवार मिळालेला नाही. या मतदारसंघातून माजी खासदार आढळराव पाटील यांचे नाव पुढे येत होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

दोन दिवसापूर्वी मंचर येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर सभेसाठी देखील आढळराव पाटील उपस्थित होते. त्यांनी अजितदादा बरोबर एकाच गाडीत प्रवास देखील केला. आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी मधून उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विरोध दर्शविला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील(Adhalrao Patil) यांना म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी देऊन आढळराव पाटील यांची बोळवन केल्याची चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. म्हाडाच्या पुणे विभागाच्या वतीने परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढली जाणार आहे. याचा शुभारंभ आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झाला. या कार्यक्रमानंतर आढळराव पाटील यांनी पत्रकारांची संवाद साधला.

ते म्हणाले, शिरूर लोकसभा निवडणुकीत मला तिकीट द्यावे अशी मागणी मी अजूनही केलेली नाही. तसेच जाहीरही केलेले नाही. पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य राहील. गेली पाच वर्षे मी मतदारसंघात फिरत असून ही निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवणारच यावर काही दिवसांपूर्वी आढळराव पाटील ठाम होते. मात्र आता आपली भूमिका बदलत ' शिरूर मधून लढण्याचा आपला आग्रह नाही' असे त्यांना स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली की काय? अशी चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच निर्णय घेतील. तो मला मान्य असेल असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावरून लढणार काय, या प्रश्नावरही त्यांनी पक्षप्रमुखांकडे बोट दाखवत मुख्यमंत्री शिंदे जे सांगतील तसेच होईल असे उत्तर देत वेळ मारून नेली. राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपल्या उमेदवारीला विरोध असल्यास आपण राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT