Aaditya Thackeray Sarkarnama
पुणे

Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधानं ; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंचे काम...'

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना करण्यात आली आहे.

मात्र, महाविकास आघाडीतील इतर दोन मित्र पक्षांनी याबाबत आक्षेप घेत निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला जाईल, असे सांगितले आहे, असे असताना देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सोमवारी पुणे दौऱ्यावर असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं यानंतर त्यांनी माध्यम म्हणजे संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.

मी जेव्हा जेव्हा देवाचे दर्शन घेतो तेव्हा त्याच्याकडे काहीच मागत नाही. आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असतं त्यामुळे मी फक्त देवाला मनापासून नमस्कार करतो. (Aditya Thackeray News )

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे ज्या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्या ठिकाणी मनसेकडून मेळावे घेण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला आनंद आहे की ते त्याठिकाणी मेळावा घेत आहेत. त्यांनी सगळीकडेच मेळावे घेतले पाहिजे. निवडणुका या सर्वांनीच लढल्या पाहिजेत. मात्र, या निवडणुका आहेत त्या युद्धाप्रमाणे लढल्या जाणे चुकीचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, यापूर्वीही गायकवाड यांनी अनेक अशी आक्षेपार्ह विधान केली आहेत.

मात्र, या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलाच नाही, असे सध्याचे चित्र आहे. बदलापूर घटनेमध्ये देखील संबंधितांवरती कारवाई करण्यात आलेली नाही. पुण्यात देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सातत्याने गुन्हेगारी कारवाया या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे या राज्याला गृहमंत्रीच नाही, असे सध्याची परिस्थिती आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असून त्याबाबत लवकरच चित्र स्पष्ट करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आलेले आहेत.

त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जे दोन अडीच वर्षांमध्ये काम केले ते लोकांसमोर आहे. त्यामुळे त्याबाबत जनता निर्णय घेईल. मात्र, ही निवडणूक आम्ही आमच्यासाठी अथवा कोणत्याही पदासाठी लढत नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय लढणार का? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून देखील चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या असलेला भ्रष्ट आणि गद्दारांचा चेहराच घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत का? अथवा चेहरा बदलणार आहेत.

याबाबत त्यांनी देखील स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवेल. जनतेला सर्वांचं काम माहिती असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे देखील काम माहिती आहे, असे सांगत आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतील, असे सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT