Aaditya Thackeray Mla Sanjay Gaikwad .jpg Sarkarnama
पुणे

Aaditya Thackeray: आमदार गायकवाडांची राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा; ठाकरे म्हणतात,'राज्यात गृहमंत्री...'

Deepak Kulkarni

Pune News: शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच टीकेचे धनी होत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ”,अशी असं वादग्रस्त विधान केल्यामुळे आमदार यांच्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीत संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी(ता.16) पुण्यात अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासह विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.

ठाकरे म्हणाले, गायकवाड यांनी यापूर्वीही अनेकदा आक्षेपार्ह विधान केली आहे. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलाच नाही असं सध्याचे चित्र आहे.बदलापूर प्रकरण,गुन्हेगारी टोळ्यांचे कृत्य असे प्रकार वारंवार घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जनता ठरवेल. जनतेला सर्वांचं काम माहिती असून उद्धव ठाकरे यांचेदेखील काम माहिती आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले.

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जे दोन अडीच वर्षांमध्ये काम केलं ते लोकांसमोर आहे. त्यामुळे त्याबाबत जनता निर्णायक निर्णय घेईल. मात्र, ही निवडणूक आम्ही आमच्यासाठी अथवा कोणत्याही पदासाठी लढत नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत असंही आमदार ठाकरेंनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही.सध्या असलेला भ्रष्ट आणि गद्दारांचा चेहराच घेऊन आगामी विधानसभा लढवणार आहेत की चेहरा बदलणार याबाबत त्यांनी देखील स्पष्टता दिलेली नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,मी जेव्हा देवाचे दर्शन घेतो तेव्हा त्यांच्याकडे काहीच मागत नाही. आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असतं त्यामुळे मी फक्त मनापासून नमस्कार करतो असेही त्यांनी मत व्यक्त केले.

'आधी जीभ छाटण्याची भाषा, आता गाडण्याविषयी...'

आपल्या वादग्रस्त आणि आक्रमक विधानांनी खळबळ उडवून देणारे शिंदे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा केल्यानंतर आमदार गायकवाड आता काँग्रेसच्या नेत्यांना गाडण्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे.त्यांनी आता मुख्यमंत्री शिंदे 19 सप्टेंबरला बुलढाण्यात येणार,काँग्रेसमधल्या कोणीही त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणला तर तिथेच गाडून टाकीन, असा इशारा संजय गायकवाडांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT