पिंपरी : महाराष्ट्रात तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे होऊ घातलेला दीड लाख कोटी रुपयांचा, दीड लाख रोजगार निर्माण करणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी हा प्रकल्प जेथे होणार होता, त्या मावळ तालुक्यातील तहसीलदार कचेरीवर १५ तारखेला निषेध मोर्चा काढला. तर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) त्यांनी भर पावसात निषेध आंदोलन केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनाही (Shivsena) हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेच आता त्याविरोधात मैदानात उतरले आहेत. ते हा प्रकल्प होऊ घातलेल्या तळेगाव-चाकण रोडवर परवा (ता.२४) सायंकाळी चार वाजता जन आक्रोश आंदोलन छेडणार आहेत. हा प्रकल्प गुजरातला पाठविल्यामुळे राज्यातील युवा पिढीच्या झालेल्या नुकसानीच्या निषेधार्थ ते केले जाणार असल्याचे शिवाजी पार्क, मुंबई येथील शिवसेना भवनातून सांगण्यात आले.
'वेदांता-फॉक्सकॉन' राज्यातून गेल्याने राज्यातील एक लाख तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यांनी आता करायचे काय, त्यांना हे खोके सरकार रोजगार कसा उपलब्ध करून देणार याचा जाब विचारण्यासाठी व हा प्रकल्प परराज्यात गेल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वेदांन्ता-फॉक्सकॉन प्रकल्प हा तळेगाव येथे होण्याचे जवळपास निश्चीत झाले होते, असा दावा यासंदर्भात काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेनेने केला आहे.
दरम्यानच्या काळात राज्यात सत्ताबदल होऊन आलेल्या खोके सरकारच्या नाकर्त्यापणामुळे हा प्रकल्प गुजरातला पाठवला गेला, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. त्यामुळे एक लाख तरुण बेरोजगार होऊन दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्याने गमावली, अशी खंतही त्यात व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.