Shinde Government latest news
Shinde Government latest news sarkarnama
पुणे

वेदांता-फॉक्सकॉन तर गेला, सामंत-मुनगंटीवार गुजरातला जाऊन काय करणार ?

सरकारनामा ब्युरो

पुणे : वेदांता प्रकल्प (vedanta) गुजरातमध्ये गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला (shinde government) विरोधकांनी धारेवर धरले आहे. हा प्रकल्प गुजरात गेल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.काँग्रेसनेही निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे सरकारमधील मंत्री गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.

"आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे राहिला असेल पण आता पुढील दोन वर्षात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेऊ. गुजरात पाकिस्तान थोडीच आहे, पण हेल्दी स्पर्धा आहे," असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वेदांता'गेल्यानंतर माध्यमांसमोर केले होते. त्यानंतर मंत्र्यांच्या या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिंदे सरकारचा गुजरात दौरा कशासाठी, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुजरात दौऱ्यावर आहेत. सामंत, मुनगंटीवार हे दोन्ही मंत्री गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांची भेट घेणार आहेत. गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेणार आहेत, त्यांच्यासोबत प्रशासनातील काही अधिकारीही आहेत.

महाराष्ट्रात गुजरात विकासाचा पॅटर्न राबविला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सामंत-मुनगंटीवार यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या योजना येणार, याबाबत उत्सुकता आहे.

ठाकरे सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागेचा विचार केला जात होता. सेमीकंडक्टर आणि ग्लास फॅब्रिकेशनचा हा प्रकल्प राज्यात आला असता तर तब्बल दोन लाख रोजगारांची निर्मिती झाली असती. तसेच राज्यात १.५० लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक झाली होती. मात्र, राज्यात सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT