Bala Bhegade, Maval News  Sarkarnama
पुणे

शहर नामांतरानंतर आता रेल्वे स्टेशनच्या नामविस्ताराची भाजपकडून मागणी

Bala Bhegade : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील दाभाडे हे शिवरायांचे सरदार होते.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे करण्याचा अगोदरच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा निर्णय फडणवीस-शिंदे सरकारने नुकताच रद्द करून पुन्हा तो तसाच नव्याने घेतला. या नामांतरानंतर आता नामविस्ताराची मागणी पुढे आली आहे. मध्ये रेल्वेवरील तळेगाव स्टेशनचे नाव तळेगाव दाभाडे स्टेशन, असे करण्याची मागणी आता भाजपनेच (BJP) केली आहे. (Bala Bhegade, Maval News)

मराठवाडा विद्यापीठाचा जसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला, त्याच धर्तीवर तळेगाव स्टेशनचाही तो तळेगाव दाभाडे स्टेशन असा करण्याची मागणी माजी मंत्री व मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे नुकतीच केली. एवढेच नाही, तर या मागणीचे निवेदन त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही दिले आहे. येत्या चार महिन्यात यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन हा नामविस्तार होईल,असा आशावाद त्यांनी आज `सरकारनामा`शी बोलताना केला.ही माझीच नाही, तर ऐतिहासिक वैभवशाली परंपरा लाभलेल्या तळेगाव दाभाडेकरांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील दाभाडे हे शिवरायांचे सरदार होते. त्यामुळे येथील रेल्वे स्टेशनचे नाव फक्त तळेगाव हे अर्धवट व चुकीचे असल्याचे सांगत शहराचा वारसा दिसणारे असे ते पूर्ण म्हणजे तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन असे हवे, असे ते म्हणाले. त्यासाठी या मागणीचे निवेदन मध्य रेल्वेच्या पुणे प्रादेशिक व्यवस्थापक (DRM) रेणू शर्मा यांना भेटून त्यांनी दिले. त्यावर संबंधित विभागाला सूचना देऊन लवकर कार्यवाही करू, असे आश्वासन मिळाल्याचे भेगडे यांनी सांगितले.

नागरिकांच्या गैरसोईचा वाडिवळे येथील गेट नंबर ४२ भुयारी मार्ग रद्द करुन जुना मार्ग पुर्ववत करण्याचीही मागणी भेगडेंच्या शिष्टमंडळाने शर्मा यांच्याकडे यावेळी केली. त्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाकरिता जो निधी लागेल तो केंद्र व राज्य सरकारकडून मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू,असे त्यांनी सांगितले. बचाव कृती समितीचे अध्यक्ष भाई भरत मोरे, सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, सूर्यकांत सोरटे, भाजप विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, संतोष येवले, कामशेत शहराध्यक्ष प्रवीण शिंदे, व्यापारी आघाडी अध्यक्ष विलास भटेवरा, सरपंच बाळासाहेब वाघमारे, माजी उपसरपंच काळूराम थोरवे, अनंता ढवळे, उद्योजक सुनील भटेवरा आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT