Rohit Pawar and CM Shinde Sarkarnama
पुणे

Rohit Pawar : 'डॉक्टर एकनाथ शिंदेंना मी विनंती करतो, लवकरात लवकर...' ; रोहित पवारांनी लगावला टोला!

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar News : पुणे पालिकेत आरोग्य प्रमुख पदावर कार्यरत असणारे डॉ. भगवान पवार यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागांतर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला आहे. मात्र निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत काही खळबळजनक खुलासे केले आहेत.

या पत्रामध्ये त्यांनी एका मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं करण्यास सांगितल्याचं नमूद केलं आहे. तसेच, इतर आरोग्यविषयक खरेदी प्रकरणातही दबाव आणला, असा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे.

या प्रकारांना नकार दिल्याने माझ्यावर आकसापोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले 'डॉ. पवार जे पुणे महापालिकेतील आरोग्य विभागात काम करतात. त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, एका मंत्र्याने त्यांना कात्रज या ठिकाणी बोलावून चुकीचं काम करण्यास सांगितलं.

एका टेंडरमध्ये हस्तक्षेप करण्यास सांगितले. एका जवळच्या व्यक्तीला टेंडर देण्यासाठी ते मॅनेज करा, असं सांगितलं. परंतु मी हे करणार नाही असं जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा त्यांना निलंबित करण्याचा प्रयत्नच नाहीतर तशी फाईल ही पुढे नेण्यात आली.'

याचबरोबर 'आता ही जर व्यक्ती आरोग्यमंत्री असतील, तर मग रुग्णवाहिका घोटाळा यामध्ये साडेपाच हजार कोटी रुपये अशा खेकडा प्रवृत्तीच्या व्यक्तीने खाल्ले आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अजून काही गोष्टी त्या विभागात चुकीच्या सुरू आहेत. यातच जर आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांना सांगून, जर टेंडर मॅनेज करण्यास सांगितलं जात असेल.

तर मग डॉक्टर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांना मी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही सर्जरी करा, नाहीतर ही जी खेकड्याची प्रवृत्ती आहे ही आरोग्य विभागाला पोखरून-पोखरून संपून टाकेन.' असंही रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणत टोला लगावला आहे.

रोहित पवारांचा ट्विटद्वारेही निशाणा -

'आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या 'खेकड्या'ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केली आहे. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

तसेच 'नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला डॉ. एकनाथ शिंदे आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? ' असं ट्वीट करत रोहित पवार यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT