Sharad Pawar-uddhav thackeray-devendra Fadnavis
Sharad Pawar-uddhav thackeray-devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांचेही फडणवीसांवर जोरदार प्रहार!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतंय,’ या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर ‘त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली होती’, असा आरोप केला होता. त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद माझ्या आग्रहामुळे स्वीकारले, असे सांगत फडणवीस यांना सडतोड शब्दांत उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या फटकाऱ्यानंतर शरद पवारांनीही फडवीणासांवर जोरदार प्रहार केले. (After Uddhav Thackeray Sharad Pawar also strongly criticized Devendra Fadnavis)

पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यायचं, याची चर्चा सुरू होती. आमदारांच्या बैठकीत दोन-तीन नावे पुढे आली होती. पण, उद्धव ठाकरे ते स्वीकारायला तयार नव्हते. बैठकीत ते माझ्या शेजारी बसले हेाते, त्यावेळी मीच त्यांचा हात वर करून हेच मुख्यमंत्री होतील, असे जाहीर केले. ते हात वर करायला आणि मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. मी आणि बाळासाहेब ठाकरे मित्र होतो. त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रासाठी योगदान आहे. त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने आपल्या जुन्या मित्राच्या मुलाला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घ्यायला भाग पाडावं, असं मला वाटलं म्हणून मी त्यांचा हात वर केला. माझा आग्रह असल्याने त्यांनी ते मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नाही, असे सांगून शरद पवार यांनी फडणवीस यांचा आरोप खोडून काढला.

माझ्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. त्यामुळे फडणवीस यांना माझी विनंती आहे की, कृपया करून असे काही आक्षेप घेऊ नका. फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते, त्यामुळे त्यांनी असे आरोप करणे मला योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यात भाषणावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतं मांडली. त्यात ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेंव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेंव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानी ही नव्हतं अन मनी ही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेंव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरेंबद्दल बरंच काही माहिती आहे.

प्रत्येकाची कामाची पद्धत असते. ठाकरे यांच्यावरही घराबाहेर पडत नाहीत, असे आरोप केले जातात. पण ते काही योग्य नाही. कारण ते एका ठिकाणी बसून सगळी यंत्रणा कामाला लावतात. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यावर अनेक संकटे आली. प्रत्येक वेळी ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केले. कोरोना काळातही मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. जनतेला विश्वास दिला. राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळात त्यांच्या सर्वांच्या पाठीशी मुख्यमंत्री ठाकरे हेाते. त्यांना राजेश टोपे यांच्या सारख्या तरुण आरोग्य मंत्र्याने साथ दिली. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते, त्यामुळे त्यांच्या टीका टिप्पणी करणे योग्य वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. वसुली करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांनी सॉफ्टवेअर तयार केले आहे, असा आरोप केला होता. त्याबाबत पवार म्हणाले की वसुलीची ती चीप अथवा सॉफ्टवेअर फडणवीस यांनी दाखवावं. त्यांनी ती चिप आम्हाला दाखवावी. ती कशी असते, ते आम्हालाही कळेल. मुख्यमंत्रीपद हे एक संस्था आहे. ते मुख्यमंत्री होते. पण, त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो, मात्र त्या पदाला फडणवीस धक्का पोचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. पण सत्ता गेल्याचे दुःख त्यांना प्रचंड आहे. त्यातूनच त्यांना मी पुन्हा येईन असे वाटत असतं त्यामुळेच ते असे आरोप करत असतात.

बंगाल, महाराष्ट्र, पंजाब हे देशाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत असतात. महाराष्ट्राचं बंगालशी एक वेगळं नातं आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवलं हे ऋणानुबंध जुने आहेत. आपल्या आणि बंगलाच्या भाषेतही साम्य आहे. ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, त्यांनी असे बोलू नये. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे, असा प्रश्न शरद पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT