पुणे

अजितदादांचा उमेदवार विरुद्ध शरद पवारांचा उमेदवार, अशी चर्चा झाली तेव्हा...

नितीन बारावकर

शिरूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज, दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पाचर्णे यांच्यासमवेतच्या काही आठवणींना उजाळा दिला.

पाचर्णे यांचे गुरूवारी (ता. ११) दीर्घ आजाराने निधन झाले. दरम्यान, अजित पवार यांनी आज पाचर्णे यांच्या तर्डोबाची वाडी (ता. शिरूर) येथील घरी जाऊन त्यांच्या पत्नी मालती, मुलगा राहुल, जावई कर्नल महेश शेळके व कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

अजितदादांनी यावेळी पाचर्णे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या १९९५ च्या पहिल्याच विधानसभा निवडणूकीतील किस्सा सांगितला. ते म्हणाले, "या निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने बाबूराव पाचर्णे अपक्ष लढत होते. असे असताना पूर्ण पुणे जिल्ह्यात मात्र ते अजितदादांचे उमेदवार असल्याची चर्चा होती. माझा बंडखोर उमेदवारांना आतून पाठींबा असल्याची आवई उठली होती. त्यावेळी खुद्द पवार साहेबांनीही मला याबाबत विचारले होते. एक माझा उमेदवार आणि एक तुझा उमेदवार हे जरा विचित्रच दिसतय, असे म्हणत त्यांनी कोपरखळीही मारली होती."

पाचर्णे यांचे नाव पुलाला देण्यासाठी पुढाकार

शिरूर बाजार समितीच्या विकासात पाचर्णे यांचे मोलाचे योगदान होते. घोडगंगा कारखाना उभारणीपासून त्यांचा सक्रीय सहभाग होता, असेही त्यांनी नमूद केले. पुणे - शिरूर रस्त्यावर तीन मजली फ्लायओव्हर होणार असून, फ्लायओव्हरला माजी आमदार पाचर्णे यांचे नाव देण्याबाबत आपण पुढाकार घ्यावा, असे स्थानिक कार्यकर्त्यांनी सूचविताच याबाबतचे अधिकार केंद्र सरकारला असून, या मार्गाच्या भुमीपूजनवेळी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या विषयावर बोलू, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, आंबेगाव - शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात, ॲड. सुरेश पलांडे व कैलास सोनवणे, उद्योजक दत्ता पाचुंदकर, पुणे जिल्हा माजी सैनिक बोर्डाचे अध्यक्ष बी. जी. पाचर्णे, युवा नेते राजेंद्र कोरेकर, भाजपचे शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी आदींसह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT