Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

टेकवडेंच्या गावाला उपाध्यक्षपद देऊनही तिथं बूथवर माणसं नव्हती; पुढच्या वेळी काटेवाडीतूनच माणसं पाठवतो!

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ‘‘माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या पुरंदरमधील जवळार्जुन गावाला काहीही कमी केलं नव्हतं. कारखान्याचा डायरेक्टर दिला, व्हाईस चेअरमनपद दिलं, तरीही तेथील बूथवर माणसं नव्हती. सर्वांत कमी पन्नास टक्के मतदान तिथं झालं. तिथल्या लोकांना बरीच कामं असतात, पुढच्या वेळेला काटेवाडीतून बूथ सांभाळायला माणसं पाठवतो,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कमी मतदान झाल्याबद्दल तेथील नेतेमंडळींना फटकारले. (Ajit Pawar expressed displeasure over lack of people at booth in Javlaarjuna)

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गव्हाणपूजन व गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वाधिक मताधिक्य दिल्यबद्दल सोमेश्वरच्या सभासदांचे त्यांनी आभारही मानले. पण, ते करत असताना ज्या ठिकाणी नेतेमंडळींनी हलगर्जीपणा दाखवली, त्यांची हजेरीही अजित पवार यांनी घेतली.

ते म्हणाले की पुरंदर तालुक्यातील नाझरे (क.प.), जेजुरी, तसेच बारामती तालुक्यातील शिरष्णे आणि मोरगाव येथील बूथवर अत्यंत कमी टक्केवारीने मतदान झाले आहे. जवळाजूर्न गावाला तर मागील काळात सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक, उपाध्यक्षपदही दिले होते. सुधाकर टेकवडे यांच्या रूपाने गावाला कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळाले होते. पण तेथील बूथवर लोक नव्हती, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.

वाघळवाडी गावाने उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून लावलेले काळे बोर्ड निवडणुकीत चर्चेचा विषय झाले होते. यावरून पवार म्हणाले, वाघळवाडी गावाचं नाव घेतलं तरी मला डोळ्यापुढं काळा बोर्ड दिसतो. वाघळवाडीनं काळा बोर्ड लावला. त्याचं लय वंगाळ वाटतं. साहेबांच्या मतदारसंघातील हे गाव आहे, त्यामुळे जास्त वाईट वाटतं. तुम्हाला राग येणं साहजिक आहे; पण नाराजी वरीष्ठांकडे सांगायची, मागणी करायची. मी तरी २१ च्या पेक्षा जादा उमेदवार देऊ शकत नाही, असेही त्यांनी सुनावले.

दरम्यान, मिळालेल्या मताधिक्याबद्दल मतदारांना त्यांनी चांगल्या कामाची ग्वाहीही दिली. मी सांगता सभेत म्हणालो होतो, इतकी मतं द्या की मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे. पण तुम्ही इतकी मतं दिली की त्या मताच्या ओझ्याने मी नुसता वाकलो नाही तर पार झोपलोय!’’ अशी सोमेश्वर कारखान्याच्या मतदारांची प्रशस्ती अजित पवार यांनी केली. मला बारा हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते; तुम्ही सोळा हजारांचे दिले आहे. ज्यांनी हे ओझे माझ्यावर टाकले आहे, त्यांच्या कष्टाचे चीज होईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

हे रेकॉर्ड कुणी तोडेल, असे मला वाटत नाही

चारही तालुक्यात आपले आमदार होते, त्याचा फायदा झाला. तसेच, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही चोख नियोजन केले. संचालक मंडळाने आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी टीम वर्क चांगलं केलं. त्यातूनही खंडाळा तालुक्यानं एक्क्याण्णव टक्के मतदान आपल्याला केलं. त्यामुळे मला वाटलं होतं १२ हजारांचं लीड मिळेल; परंतु तुम्ही त्यात चार हजार मिळवून सोळा हजारांचं लिड दिलं. राज्यात इतका मोठा विजय कुणाला मिळाला नसेल. मला वाटत नाही हे रेकॉर्ड कुणी तोडेल. एवढा विश्वास टाकलाय, त्यामुळे तुमच्या कष्टाचं चीज होईल असं काम करावं लागणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. या प्रसंगी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, डी. के. पवार, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीता फरांदे, तुकाराम जगताप उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT