Laxman Jagtap News, Ajit Pawar
Laxman Jagtap News, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Laxman Jagtap News : आता लक्ष्मण दिसणार नाही, याचे दुख राहील, खंबीर अजितदादाही गहिवरले

सरकारनामा ब्यूरो

Laxman Jagtap News : चिंचवडचे भाजपचे (BJP) आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजाराने अखेर परवा (ता.३) निधन झाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (ता.५) जगताप कुटुंबियांचे त्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील (पिंपळे गुरव येथील) निवासस्थानी जाऊन सांत्वन केले.

पाऊण तासांच्या भेटीत अजितदादांनी स्व. आमदार जगतापांच्या पत्नी, दोन्ही बंधू शंकर आणि विजय, त्यांची मुले, मुली, जावई यांची विचारपूस केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) भोसरीचे माजी आमदार आणि स्व. जगतापांचे नातेवाईक विलास लांडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, मुख्य प्रवक्ते आणि समन्वयक तथा माजी महौपार योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे आदी यावेळी उपस्थित होते.

जवळचा सहकारी गेला असे सांगत लक्ष्मण आत दिसणार नाही याबद्दल अजितदादांनी या भेटीत दुख व्यक्त केले. १९९१ ला पहिल्यांदा बारामतीचा खासदार झालो. त्यावेळी मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडला पुण्याच्या बरोबरीने आणण्याच्या माझ्या प्रयत्नांना साथ देणाऱ्या त्यावेळच्या तरुण सहकाऱ्यात लक्ष्मण होता, असे ते म्हणाले.

स्व. आमदार जगताप हे रुग्णालयात उपचार घेत असताना अजितदादांनी भेटून त्यांची विचारपूस केली होती. ही बाब रुग्णालयातून घरी परत आल्यानंतर जगतापांनी सांगितली होती. त्यामुळे बाबा आता बरे होतील, असे वाटले होते, ही आठवण आजच्या भेटीत अजितदादांना जगतापांच्या कन्येने सांगितली. ती सांगताना तिचा कंठ दाटून आला होता.

दरम्यान, अजितदादांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही जगताप कुटुंबियांची आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.आम्ही तुमच्याबरोबर आहोत,असा धीर त्यांनी यावेळी जगताप कुटुंबाला दिला. भाजपच्या विधान परिषद सदस्या उमा खापरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी,माजी नगरसेवक अभिषेक बारणे, बाबा त्रिभूवन,हर्षल ढोरे, सागर अंगोळकर आदी यावेळी हजर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT