Ajit Pawar, Shekhar Singh Sarkarnama
पुणे

Pcmc News : अजितदादांच्या 'इंजेक्शन'चा गुण आला!; महापालिका आयुक्त घडाघडा बोलू लागले

PCMC Commissioner Shekhar Singh Talks With Media : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त बोलते झाले...

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri Chinchwad Municipal Corporation Commissioner :

गेल्या महिन्यात 21 तारखेला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उद्योगनगरीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे मीडियाने व्हिआयपींच्या शहर भेटीत त्यांना पोलिस भेटू देत नसल्याची तर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे भेटत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर शेखरसिंहांना सांगतो, असे आपल्या स्टाईलमध्ये अजितदादा म्हणाले होते. त्यानंतर आयुक्त आता भेटू लागल्याने Ajit Pawar यांच्या इंजेक्शनचा गुण आल्याची चर्चा त्यांच्या आवडत्या शहरात रंगली आहे.

सुट्टी असूनही शेखरसिंहांनी शनिवारी (ता. 3) मीडियाशी महापालिकेत संवाद साधला. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड ही नवनगर पालिका असताना आशिया खंडात श्रीमंत समजली जात होती. पण महापालिका झाल्यानंतर आता ती तशी स्थिती राहिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या विचारात आहे? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही कबुली दिली. कर्ज घेणे हे पाप नाही, असे सांगत त्यांनी कर्ज घेण्याचे समर्थन केले. यापूर्वी दोनशे कोटी रुपये कर्जरोख्याद्वारे महापालिकेने जमा केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जगात सध्या न्यूयार्क ही श्रीमंत महापालिका असल्याची माहिती त्यांनी यावेळी पुरवली.

21 जानेवारीला सकाळी पालकमंत्र्यांकडे तक्रार होताच शेखरसिंहांनी त्याच दिवशी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी मीडियाला स्वतः हून बोलावणे धाडले. यावेळी दर 15 दिवसांनी आपण भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. बर्न वॉर्ड उभारणे हे खूप गुंतागुंतीचे काम असल्याने ते आतापर्यंत झालेले नाही. चिंचवड येथील जुन्या तालेरा रुग्णालयात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बर्न वॉर्ड तथा हॉस्पिटलअभावी शहरातील भाजलेल्या रुग्णांना सध्या पुण्यात उपचारासाठी न्यावे लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम शहरात शंभर टक्के पूर्ण झाल्याचे शेखरसिंहानी यावेळी सांगितले. दरम्यान, ते पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे शेकडो कर्मचारी आणि अधिकारी हे त्याची डेडलाईन संपेपर्यंत म्हणजे शुक्रवारी (ता. 2) रात्री बारा वाजेपर्यंत फिल्डवर होते. तर, त्याचे नोडल अधिकारी तथा पालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे हे पहाटे तीनपर्यंत महापालिका मुख्यालयात तळ ठोकून होते. त्यांनी ही पाहणी पूर्ण केल्याचा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाला सादर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT