Pune University Vice Chancellor Suresh Gosavi : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा राडा झाला आहे. ललित कला केंद्र या नाट्य विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरली गेली, जी हिंदू धर्माचा अपमान करणारी असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे विद्यापीठात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकारावर आता विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. 'जब वी मेट' या नावाच्या या नाटकामध्ये रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. या नाटकामध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषक प्रमाणे दाखवण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याच बरोबर प्रभू श्रीरामांबाबत देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यामुळे अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी-देवता बद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि यानंतर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
या प्रकरणात विभाग प्रमुख आणि विद्यार्थ्यांवर धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान, हेतू पुरस्सर केलेले आक्षेपार्ह कृत्य आणि दंगा करण्याबद्दलची शिक्षा आदी कलमे लावण्यात आली आहे. यामध्ये सहा महिन्यांसह दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची तरतूद आहे.
याबाबत आता पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोसावी म्हणले, 'ललित कला केंद्रमध्ये घडलेल्या प्रकाराची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यापीठ कायद्यानुसार त्यांची प्रशासकीय चौकशी करण्यात येत आहे.
विद्यापीठ नियमावलीनुसार संबंधित दोषींवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. कोणत्याही समाजाची भावना दुखावल्या जाणार नाही ही विद्यापीठाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे या घटनेमुळे जर लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर विद्यापीठ प्रशासन म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.